कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबतही शासनाचे आदेश जारी
अलिबाग,दि.२६: राज्यात साथरोग प्रतिबंध अधिनियम, १८९७ व आपत्ती निवारण कायदा, २००५ ची अंमलबजावणी सुरु आहे.
कोविड १९ प्रादूर्भावामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना अर्थचक्रास चालना देण्यासाठी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली. त्यामुळे गर्दी व्यवस्थापन, शारीरिक अंतर पाळणे व मास्कचा वापर करण्यामध्ये नागरिकांकडून शिथिलता व निष्काळजीपणा झाल्याने राज्याला कोविड-१९ बाधेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागला.
या पार्श्वभूमीवर कोविड- १९ बाधेच्या लाटेची द्विरुक्ती टाळण्यासाठी सक्षम प्राधिकारी तसेच अध्यक्ष, राज्य व्यवस्थापन समिती यांना मिळालेल्या अधिकारानुसार खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात आले आहेत….
१)राज्यातील मंत्रालय / अधिनस्त कार्यालय / विधानभवनासह सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येण्याऱ्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णतः झाकले जाईल, अशा पध्दतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील.
२) राज्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख / आस्थापना प्रमुख यांनी करावी व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करुन घ्यावे. ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करुन कार्यालयीन अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करावे, जेणेकरुन सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी. ३) सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजादरम्यान मास्कचा सुयोग्य वापर तसेच लसीकरण पूर्ण करून घेणे, यावर देखरेख करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख/ कार्यालय प्रमुख हे आस्थापना अधिकारी किंवा एका अधिकाऱ्याला नामनिर्देशित करतील.
४) सर्व कार्यालये व कार्यालयाच्या आवारात अभ्यागतांसह मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत असल्याने विनामास्क वावरणाऱ्या अभ्यागत / कर्मचारी / अधिकारी यांना संबंधित अभ्यागत / कर्मचारी / अधिकारी ज्या विभागाच्या क्षेत्रात / आवारात विनामास्क आढळला त्या कार्यालयाच्या नामनिर्देशित अधिकारी कार्यालय प्रमुखाने नामनिर्देशित केलेला अधिकारी दंड करण्यास सक्षम प्राधिकारी राहील.
५) सक्षम प्राधिकारी विनामास्क आढळणाऱ्या अभ्यागत/कर्मचारी/अधिकाऱ्याना दंड आकारणी करून त्याबाबतची पावती देईल. सक्षम प्राधिकारी ही दंडाची रक्कम संबंधित कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करेल तसेच आहरण व संवितरण अधिकारी दंडाची रक्कम शासनाने निश्चित केलेल्या लेखाशीर्षाखालील असलेल्या जमा सांकेतांकाखाली भरणा करेल.
तरी कोविड- १९ प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत सर्वांनी मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी नागरिकांना केले आहे.