मुंबई दि.५ : येत्या बुधवारी ८ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने सुपरमून दिसणार असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना दा. कृ. सोमण म्हणाले की त्या दिवशी पौर्णिमा असून चंद्र पृथ्वीच्याजवळ ३ लक्ष ५६ हजार ९०७ किलोमीटर इतक्या अंतरावर येणार आहे. त्यामुळे त्या दिवशी रात्री चंद्रबिंब आकाराने १४ टक्के मोठे आणि ३० टक्के जास्त प्रकाशित दिसेल. बुधवारी रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात या सुपरमूनचे दर्शन अगदी साध्या डोळ्यांनी घेता येईल. चंद्रबिंब रात्रभर आकाशात दर्शन देत पहाटे पश्चिमेला मावळेल. यानंतर पुढच्या वर्षी २७ एप्रिल रोजी आपणा सर्वांस सुपरमूनचे दर्शन घडणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.