अलिबाग, दि.8: करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये,यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व स्वस्तधान्य दुकानांमधून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय शिधापत्रिकाधारक व प्राधान्य कुटूंब शिधापत्रिकाधारकांना दि.1 एप्रिल 2020 पासून या महिन्याचे नियमित अन्नधान्य वितरणास सुरुवात झाली आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय व प्राधान्य कुटूंबाच्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ वितरणासही जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंची कृत्रिम टंचाई भासून चढ्या दराने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याविरुध्द कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 18.52 लाख आहे. सध्या जिल्ह्यात माहे एप्रिल, मे व जून 2020 या महिन्याचे नियमित अन्नधान्य त्या त्या महिन्यात वितरीत करण्यात येणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकास प्रति शिधापत्रिका 35 किलो दरमहा अन्नधान्य (तांदूळ-25 किलो व गहू 10 किलो) तांदूळ रु.3/-प्रति किलो व गहू रु.2/- प्रति किलो प्रमाणे वितरित करण्यात येते. अंत्योदय शिधापत्रिकास रु.20/-प्रति किलो प्रमाणे प्रति शिधापत्रिका 1 किलो साखर मिळते. प्राधान्य कुटूंब शिधापत्रिकाधारकास प्रति व्यक्ती 5 किलो दरमहा अन्नधान्य (तांदूळ-3 किलो व गहू 2 किलो) तांदूळ रु.3/-प्रति किलो व गहू रु.2/- प्रति किलोप्रमाणे वितरित करण्यात येते. एप्रिल 2020 चे नियमित अन्नधान्य अंत्योदय व प्राधान्य कुटूंब शिधापत्रिकाधारकास दि.01 एप्रिल पासून वितरण करण्यास सुरु झाली असून जिल्हृयात सर्वत्र दि.07 एप्रिल रोजी अन्नदिन साजरा करण्यात आला. दि.07 एप्रिल पर्यंत अंत्योदय योजनेंतर्गत गहू 460 मे.टन, तांदूळ 1 हजार 147 मे.टन असे एकूण 1 हजार 607 मे.टन. तर प्राधान्य कुटूंब योजनेंतर्गत गहू 1 हजार 420 मे.टन, तांदूळ 2 हजार 125 मे.टन असे एकूण 3 हजार 545 मे.टन.अन्नधान्य जिल्ह्यात वितरीत झाले आहे. रायगड जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे 1 हजार 880 क्विंटल गहू, 3 हजार 272 क्विंटल तांदूळ, तर 366 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे 2 हजार 598 शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्डधारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ दि.5 एप्रिल पासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेकरिता तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगम, कळंबोली कडून प्राप्त करून घेतले जात आहे. दि.5 एप्रिल पासून पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदूळाचे वितरण सुरू करण्यात आले आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्ये सुध्दा त्या त्या महिन्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे. आतापर्यंत अंत्योदय व प्राधान्य कुटूंब शिधापत्रिकाधारकांना 16.5 मे.टन मोफत तांदूळ वितरित करण्यात आलेला आहे.