पनवेल दि.20: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी घोषित करण्यात आलेले 24 जून रोजीचे सिडको घेराव आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणारच आहे. नामकरणासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची चर्चेची दुसरी फेरीही मुख्यमंत्र्यांच्या हट्टामुळे फिसकटली. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे न ऐकून घेता ते बैठकीतून एकदा निघून गेले. त्यामुळे काहीही झाले तरी ‘दिबां’च्या नावासाठी आम्ही माघार घेणार नाही, असा निर्धार सर्वपक्षीय कृती समितीने व्यक्त केला आहे.
मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या या बैठकीला राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सिडकोचे एमडी संजय मुखर्जी, सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, तसेच संतोष केणे, गुलाब वझे, जे. डी. तांडेल, दीपक म्हात्रे, भूषण पाटील, दशरथ भगत, मनोहर पाटील, विनोद म्हात्रे, मेघनाथ म्हात्रे आदी उपस्थित होते. या वेळी कृती समितीच्या शिष्टमंडळाचे ऐकून न घेता, चर्चा न करताच मुख्यमंत्री बैठकीतून निघून गेल्याने सर्वपक्षीय कृती समितीने 24 जूनचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत करणारच, असा निर्धार केला आहे.
भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कष्टकर्यांचे झुंजार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे, या मागणीसाठी लोकचळवळ उभी राहिली आहे. सर्व स्तरांतून तिला पाठिंबा मिळत आहे. खरे तर ही मागणी सन 2008पासूनची आहे. असे असताना राज्यातील ठाकरे सरकारने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या विमानतळाला देण्यात येईल, असे जाहीर केले असून तसा ठराव राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोमार्फत करून घेतला आहे. त्यास रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांतील ‘दिबा’प्रेमी नागरिकांचा तीव्र विरोध आहे. हा असंतोष 10 जून रोजी मानवी साखळी आंदोलनातून स्पष्टपणे दिसून आला. तरीही शिवसेनेचे नेते हे बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव विमानतळाला देण्यात येईल असे सांगत असून 24 जूनचे आंदोलन दडपण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही, असे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने म्हटले आहे.
दरम्यान, 24 जूनच्या सिडको घेराव आंदोलनाची जोरदार तयारी सुरू असून, या अनुषंगाने घेण्यात येत असलेल्या विभागनिहाय बैठकांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. ‘आमच्या मनानं घेतलाय ठाव, विमानतळाला दिबांचंच नाव!, अशी ठाम भूमिका ‘दिबा’प्रेमी जनतेने घेतली आहे. किमान एक लाख लोकांचा या आंदोलनात सहभाग असणार आहे. शांततापूर्ण स्वरूपात हे आंदोलन केले जाणार असून त्या दृष्टीने नियोजन व तयारी केली जात आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!