पनवेल दि.२८: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय ‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धा होत असून या स्पर्धेच्या अंतिम फेरीला उद्या पासून पनवेलमध्ये प्रारंभ होणार आहे. यंदा या स्पर्धेचे सातवे वर्ष असून सिने नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांची यावेळी उपस्थिती लाभणार असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला ०१ लाख रूपये आणि मानाचा ‘अटल करंडक’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आज मार्केट यार्ड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदेत दिली.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस स्पर्धा सचिव व सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत ब-हाटे, स्पर्धा सचिव व प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, ऍड. चेतन जाधव, अमोल खेर, गंभीर दांडेकर, अमरीश मोकल, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रोहित जगताप, चिन्मय समेळ उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांना अधिक माहिती देताना परेश ठाकूर यांनी सांगितले कि,पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उदघाटन शुक्रवार दिनांक २९ जानेवारीला सकाळी ०९ वाजता होणार आहे. तर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ०५ वाजता होणार आहे. पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक आणि ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून भाजपचे सांस्कृतिक सेलचे प्रदेक्षाध्यक्ष ऍड. शैलेश गोजमगुंडे, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रसिद्ध सिने अभिनेते संजय नार्वेकर, प्रसिद्ध सिने अभिनेते जयंत वाडकर, लेखक, दिग्दर्शक व प्रसिद्ध अभिनेता अद्वैत दादरकर, प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा देशमुख, प्रसिद्ध निर्मात्या कल्पना कोठारी, प्रसिद्ध अभिनेते भरत सालवे, प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, अभिनेते अभिजित झुंझारराव, कवी व प्रसिद्ध अभिनेते राहुल वैद्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आपल्या परिसरात विविध राज्यातील बहुभाषिक नागरिक नोकरी, शिक्षण, व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत, त्यांनाही मराठी नाट्य कलेची माहिती व्हावी, यासाठी प्री इव्हेंट घेण्यात आले होते अशी माहिती परेश ठाकूर यांनी देऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सांगितले कि, दरवर्षी हि स्पर्धा डिसेंबर महिन्यात होत होती, पण यंदा कोरोनामुळे काही मर्यादा आल्या तसेच डिसेंबरमध्ये कोरोनाचा दुसरा स्टेन येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती, त्यामुळे हि स्पर्धा रद्द होण्याची भीती होती. मात्र कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने आमदार प्रशांत ठाकूर हि स्पर्धा आयोजनासाठी आग्रही राहिले. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धा दर्जेदार आणि रसिकांच्या पसंतीची ठरावी यासाठी मेहनत घेतली जात आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या दृष्टिकोनातून पुरेपूर काळजी घेण्यात येणार असून कोरोना संदर्भात शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून हि स्पर्धा होणार आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. त्यांनी पुढे बोलताना, राज्यातील मुंबई, रायगड, बारामती, धुळे, सांगली, औरंगाबाद, नाशिक, सातारा, इचलकरंजी, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, बीड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, सांगली, ठाणे, आदी जिल्ह्यातील एकूण ७५ एकांकिकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता, त्यातील २४ एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी झाली आहे, अशीही माहिती परेश ठाकूर यांनी यावेळी दिली.

अशी आहेत पारितोषिके
प्रथम क्रमांक- ०१ लाख रूपये, आणि मानाचा अटल करंडक द्वितीय क्रमांक- ५० हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह, तॄतीय क्रमांक- २५ हजार रूपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक- १० हजार रूपये, उत्तेजनार्थ क्रमांक ०५ हजार रुपये, प्रमाणपञ व सन्मानचिन्ह तसेच सर्वोत्कॄष्ठ दिग्दर्शक/अभिनेता/अभिनेञी/लेखक/संगीत/नेपथ्य/प्रकाश योजना/ उतेजनार्थ असे विविध पारितोषिके देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!