अलिबाग दि.30 : करोना विषाणूचा प्रार्दूभाव कमी करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी घराबाहेर पडून, संस्थेतील सभासदांनी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या जिल्ह्यातील सर्व गृहनिर्माण संस्थांनी संस्थेच्या गेटजवळ सॅनिटायझर्स ठेऊन प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात स्वच्छ करण्यास सॅनिटायझर्स उपलब्ध करुन द्यावे, इंटरकॉमद्वारे प्रत्येक सदस्यास आवश्यक असणाऱ्या किराणा,भाजीपाला इ.गोष्टींची मागणी संकलित करावी व त्यानुसार जवळच्या किराणा, भाजीपाला पुरवठा करणाऱ्या शॉपधारकास जीवनावश्यक वस्तूंची ऑर्डर (सदस्य निहाय) देऊन सामान गेटवरच मागवून घेण्यात यावे, एकेका सदस्याच्या घरी सिक्युरिटी मार्फत किराणा सामान पोहोचवावे अथवा प्रत्येक घरातील एका सदस्यास बोलावून गेटवर त्याचे वाटप करावे. मात्र हे करताना गर्दी होणार नाही,याची दक्षता घ्यावी. संस्थेचे सदस्य तातडीच्या न टाळता येणाऱ्या कारणाशिवाय बाहेर जाणार नाहीत, याची दक्षता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. तसेच सोसायटीचे क्लब हाऊस, बगीचा येथे सदस्य वा लहान मुले एकत्र येणार नाहीत, याबाबत योग्य ती दक्षता वा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे, सोसायटीमधील परिसर स्वच्छ ठेवणे, निर्जंतुकीकरण करुन घेणे, गरजेचे आहे, सोसायटीमधील सदस्यांकडे बाहेरील व्यक्ती राहावयास आल्यास त्याची माहिती संस्थेमार्फत संबधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार,तलाठी, ग्रामसेवक यांना तात्काळ कळविणे बंधनकारक आहे. या सर्व मार्गदर्शक सूचनांचे सर्व गृहनिर्माण संस्थांनी काटेकोरपणे पालन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहेत.