मुंबई, दि.4: सोलापूरच्या जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. काल या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर रणजितसिंह यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
युनेस्को आणि लंडन येथील वार्की फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर येथील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन केले आहे. पुरस्काराची बातमी समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्यांना दूरध्वनी करून त्यांचे कौतुक केले.
यावेळी रणजितसिंह डिसले यांनी ग्रामीण भागात शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी ते करीत असलेल्या उपक्रमांची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली तसेच तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करतो ते सांगितले.
क्यूआर कोडच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन 140 देशांतील 12 हजार शिक्षकांतून त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 7 कोटी रुपये अशी पुरस्काराची मिळालेली रक्कम इतर देशातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच टीचर इनोव्हेशन फंडसाठी आपण वापरणार असल्याचे त्यांनी सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्षणासाठी दाखवलेल्या त्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली. राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे व मुलांमध्ये शिक्षणाची आवड जोपासण्यासाठी निश्चितपणे त्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो आणि अशा उपक्रमशील शिक्षकांची राज्य तसेच देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे, असेही मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलताना म्हणाले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!