50 खाटांच्या कोविड हॉस्पिटलचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण
अलिबाग, दि.4: उरण तालुक्यात नव्याने उभारण्यात आलेल्या कोविड आरोग्य केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
मागील काही दिवसांपूर्वी उरण तालुक्यात वाढलेल्या करोनाच्या प्रादूर्भावामुळे उरण तालुक्यात कोविड रुग्णालय उभारावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती. त्यानुषंगाने सिडकोच्या अर्थसहाय्यातून बोकडविरा येथे सिडकोच्याच ट्रेनिंग सेंटरमध्ये 59 खाटांचे डेडिकेटेड कोविड सेंटर उभारण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या कोविड आरोग्य केंद्रात रूग्णांना जास्तीत जास्त आरोग्य सुविधा कशा देता येतील आणि याची क्षमता 100 खाटांपर्यत वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच या कोविड आरोग्य केंद्रात सर्व प्रकारच्या रूग्णांवर उपचार व्हावेत, अशी सूचनाही त्यांनी संबंधिताना केली.
त्या पुढे म्हणाल्या की, उरण तालुक्यात रूग्णालय उभारण्यासाठी अडीच एकर जागेची मागणी सिडकोकडे करण्यात आली असून त्याचा शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी निधी चौधरी, बबन पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, आर.सी घरत, कामगार नेते महेंद्र घरत, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, बाजीराव परदेशी, कुंदा वैजनाथ ठाकूर, प्रशांत पाटील, दिनेश म्हात्रे, आदी मान्यवर उपस्थित होते.
