कळंबोलीदि. १९ (दीपक घोसाळकर) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांची जयंती कळंबोलीतील घाटी मराठी संघटने तर्फे मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यावर्षी या संघटनेकडून शिवरायांच्या कट्यार ची प्रतिकृती म्हणून आठ फूट लांबीची स्टील ची कट्यार साकारण्यात करण्यात आलेली होती. शिवरायांचे असलेले शौर्य ,पराक्रम भावी पिढी समोर आदर्शवत रहावे यासाठीच शिवरायांच्या कट्याराची प्रतिकृती साकारण्यात आली असल्याचे संघटनेचे अध्यक्ष पंकज सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
कळंबोली वसाहतीमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची जयंती महोत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोषात विविध संघटनांकडून साजरे केले जाते .मात्र वसाहती मधील घाटी मराठी संघटनेकडून शिवजयंती दरवर्षी अनोख्या अन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. घाटी मराठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कै. संतोष गायकवाड यांच्या संकल्पनेतून कळंबोली वसाहतीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली आहे.शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री शिवजन्मोत्सव साजरा करून पाळणाही सुवासिनीं च्या उपस्थितीमध्ये गायला जातो. जयंतीच्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन शिवजन्म उत्सव मोठ्या भक्तीभावाने वसाहतीमधील घाटी मराठी संघटनेच्या कार्यालयाजवळ साजरा केला जातो . शिवजन्मोत्सव साजरा केल्यानंतर १०१ मशालींची मानवंदना शिवरायांना संघटने कडून देण्यात आली. तसेच उपस्थित शेकडो शिवभक्तांकडून महाआरती सोहळा करण्यात आला. शिवजयंतीच्या दिनी सायंकाळी सहा वाजता शिवप्रतिमेवर महा अभिषेकही करण्यात आला.दरवर्षी या संघटनेकडून ऐतिहासिक अशा वस्तूंचे प्रदर्शन केले जात आहे . २०२० पासून ऐतिहासिक असलेल्या शस्त्रांच्या भव्य प्रतिकृती या घाटी मराठी संघटने कडून शिवजयंती निमित्त साकारल्या जात आहेत . पनवेल तालुक्यामध्ये आगळे वेगळे आकर्षण ही संघटना निर्माण करून शिवरायांचा इतिहास समाजासमोर मांडून भावी पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक उपक्रम संघटना राबवित आहे. २०२० मध्ये बारा फूट उंचीचा जिरेटोप साकारण्यात आला होता .२०२१ आठ फुटी भव्य दिव्य तलवार,२०२२ मध्ये आठ फुटी शिवरायांची राजमुद्रा ,२०२३ ला विश्वविक्रमी दीडशे फूट आकर्षक वाघ नखे, २०२४ मध्ये भव्य शिवप्रताप ऐतिहासिक संच साकारण्यात आला होता. अशा विविध ऐतिहासिक व संग्रहित असणाऱ्या शिवकालीन सामग्री तयार करण्यात आल्यानंतर त्या संपूर्ण नवी मुंबईमध्ये एक आकर्षक केंद्रबिंदू बनल्या होत्या. या वर्षी घाटी मराठी संघटनेच्या माध्यमातुन शिवजयंती निमित्त पंकज सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून ८ फुट लांब आणि १३० किलो वजनाची स्टीलची कट्यार बनवण्यात आली आहे . छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचावा या उद्देशाने घाटी मराठी संघटनेमार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचे यावेळी अध्यक्ष पंकज सूर्यवंशी यांनी सांगितले. या संघटनेचे संस्थापक कै.संतोषभाऊ गायकवाड यांच्या प्रेरणेने विद्यमान अध्यक्ष – पंकज सुर्यवंशी , उपाध्यक्ष -किरण गायकवाड़ , शैलेश धूमाळ,संदीप जाधव ,रोहित खराडे ,तुषार जाधव ,दत्ता पिसाळ ,गणेश थोरात , आबा इंगळे ,मंगेश सावंत , गणेश अहिरे , वैभव यादव या शिवप्रेमींकडून शिवजयंतीचे आगळे वेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.संघटनेकडून शिवरायांच्या कट्यार ची प्रतिकृती आठ फूट लांबीची साकारण्यात आली असून शिवप्रेमींना पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहे. शिवरायांच्या कट्यार ची प्रतिकृती वसाहतीमधील या शिवप्रेमींनी मोठ्या मेहनतीने तयार केली आहे. या कट्यारीचे पूजन व अनावरण शिवजन्मोत्सव झाल्यावर नंतर लगेच शिवप्रेमींकडून करण्यात आले. घाठी मराठी संघटनेच्या कार्यालयाजवळ तसेच जुन्या सुधागड रस्त्यावर भव्य दिव्य भगव्या पताका झेंडे लावून सर्व भगवेमय वातावरण शिवजयंती निमित्त करण्यात आले होते. शिवजयंतीनिमित्त साकारण्यात आलेल्य शिवकालीन कटयार ची प्रतिकृती पाहण्यासाठी नवी मुंबईतील शिवप्रेमींनी कळंबोलीतील घाटी मराठी संघटनेच्या ऐतिहासिक देखाव्या स्थळी भेट देऊन कट्यारच्या प्रतिकृती सोबत सेल्फी ही घेतले.

कळंबोलीतील सुधागड विद्या संकुलात शिवजयंती उत्साहात
कळंबोलीतील सुधागड विद्या संकुलतील सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेला शिवजयंती उत्सव विद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. विद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध ऐतिहासिक वेशभूषा पारंपारिक पेहेराव करून शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरा केला. शिवजयंती उत्सवात शिक्षक विद्यार्थी पालक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सुधागड विद्या संकुलाचे प्राचार्य राजेंद्र बाजीराव पालवे हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते तर उपमुख्याध्यापिका अनिता पाटील , पर्यवेक्षक बाबुराव शिंदे , पर्यवेक्षिका पूनम कांबळे , कार्यालयीन प्रमुख बीना कडू, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख संजय पाटील ,असे मान्यवर समारंभ प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सरस्वती पूजन , शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाचा शुभारंभ प्राचार्य राजेंद्र पालवे हस्ते करण्यात आला. व्यासपीठाजवळ छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला. माध्यमिक विभागाच्या संगीत शिक्षक वृंदांनी ईशस्तवन सदर केल्यानंतर सर्व मान्यवरांच्या व उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवरायांची आरती करण्यात आली. उप मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. माध्यमिक विभागाच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख पद्धतीने नृत्य गीतातून व्यासपीठावर साकार केला. यावेळी विद्यार्थ्यांसह ज्युनियर कॉलेजच्या सुयेशा पाटील यांनी शिवगर्जना सादर केली. बाबुराव शिंदे ,शरद देशमुख यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील निवडक प्रसंगांवर आधारित अभ्यासपूर्ण शिवव्याख्यान सादर करून उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना शिवकाळातील इतिहासाची आवेशपूर्ण पद्धतीने नव्याने ओळख करून दिलीं . अध्यक्षीय भाषणात प्राचार्य पालवे यांनी छत्रपती शिवरायांचा गौरव करताना म्हटले की शिवरायांच्या आठवणी सांगायला तास दीड तासांचा समारंभ अपुरा पडेल असे दैदिप्यमान कार्य शिवरायांनी ३५० वर्षांपूर्वी केलेले आहे. शिवरायांच्या तेजस्वी कार्याला इतक्या वर्षानंतरही तशीच झळाळी कायम आहे आणि राहणार ! शिवाजी महाराज यांचा जन्मच दैवी चमत्कार आहे. अशा महापुरुषांचे स्मरण भावी पिढीला अभ्यासक्रमातून करून देण्याचे महत्वाचे कार्य आपण शिक्षकांनी अशा समारंभातून प्रामाणिक पणाने करणे महत्वाचे आहे. सादर करण्यात आलेला समारंभ अतिशय देखणा आणि नियोजन बद्ध केल्याबद्दल श्री. पालवे आपल्या अध्यक्षीय भाषणात समाधान व्यक्त केले.