पनवेल दि.१८: पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या बंद पडलेले सांडपाणी प्रक्रिया केंद्र आज शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता मिलिंद कदम व सांडपाणी प्रक्रिया व पर्यावरण तज्ज्ञ रोहित कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुनश्च कार्यान्वित करण्यात आले. रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर, शव विच्छेदन गृह, पथोलॉजी लॅबोरेटरी, महिला प्रसूती कक्ष इत्यादी ठिकाणचे दररोज सुमारे 500 लिटर पाण्यावर प्रक्रिया करून ड्रेनेज मध्ये सोडण्यात येणार आहे.
सप्टेबर २०१९ मध्ये रुग्णालयाच्या लोकार्पणाच्या वेळी बसवण्यात आलेली सांडपाणी प्रक्रिया तांत्रिक कारणामुळे बंद अवस्थेत होती त्यामुळे रुग्णालयात वापरण्यात आलेले पाणी थेट नाल्यामध्ये सोडण्यात येत होते. त्यामुळे जलप्रदूषण व पर्यायाने आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता. ही बाब लक्षात येताच शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशखर सोमण यांनी हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणाची लेखी परवानगी मागून सा. बां. विभागाचे उप अभियंता मिलिंद कदम व तळोजा एम. आय. डी.सी. येथील पर्यावरण त रोहित कुमार यांच्याशी संपर्क करून, शनिवार दि. २८/१०/२३ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व अधीक्षक डॉ. मधुकर पांचाळ यांच्या उपस्थितीत सदर यंत्रणेचे सर्वेक्षण करून अहवाल तयार केला.
तज्ज्ञांकडून मिळालेल्या सूचना व संबंधित कंत्राटदार यांच्याशी मिलिंद कदम यांनी संपर्क साधला व योग्य ती दुरुस्ती व सुधारणा करून सदर सांडपाणी प्रक्रिया केंद्र पुनश्च कार्यान्वित करण्यात आले. या प्रसंगी चंद्रशेखर सोमण, मिलिंद कदम, सेक्शन इंजिनिअर श्रीमती गायकवाड, सांडपाणी प्रक्रिया तज्ज्ञ रोहित कुमार तसेच रुग्णालयाचे प्रतिनिधी डॉ. गीते, विकास कोमपल्ले व संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.
सार्वजानिक बांधकाम विभागातर्फे पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात २५ मृतदेहांसाठी नव्याने शवागार बांधण्याचे काम प्रगती पथावर असून सुमारे १ कोटी २० लाखांचा प्रस्ताव व तसेच इलेक्ट्रिकल व रिफ्रिजरेशन करण्यासाठीचा अंदाजे ८० लाखांचा दुसरा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती सार्वजानिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती संजीवनी कट्टी यांनी दिली.
सदर शवागराची अत्यावश्यकता लक्षात घेता दोन्ही प्रस्ताव सरकार दरबारी पाठपुरावा करून लवकरात लवकर मंजूर करण्याचे आश्वासन शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख अॅड. प्रथमेश सोमण यांनी दिले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!