राज्यस्तरीय १८ व्या स्पर्धेत ‘अधोरेखित’, १९ व्या स्पर्धेत ‘शाश्वत वनीकरण’ आणि ‘उद्याचा मराठवाडा’, २० व्या स्पर्धेत ‘अनलॉक’ आणि ‘लोकदीप’ अंकानी पटकाविले प्रथम क्रमांक
रायगड जिल्हास्तरीय १८व्या स्पर्धेत ‘साहित्यआभा’, १९ व्या स्पर्धेत ‘पर्ण’, २० व्या स्पर्धेत ‘आगरी दर्पण’ प्रथम क्रमांकाचे मानकरी
पनवेल दि.१९: शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १८, १९ आणि २० व्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (शुक्रवार, दि. १९ नोव्हेंबर) पनवेलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला.
सन २०१८ च्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत पल्लवी परुळेकर-बनसोडे यांच्या 'अधोरेखित' अंकाने, सन २०१९ च्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत रविंद्र धारिया यांच्या 'शाश्वत वनीकरण' आणि राम शेवडीकर यांच्या 'उद्याचा मराठवाडा' या अंकांनी (विभागून) तर २०२० च्या राज्यस्तरीय स्पर्धेत रश्मी पदवाड- मदनकर यांच्या 'अनलॉक' आणि भास्कर लोंढे यांच्या 'लोकदीप' या अंकानी (विभागून) प्रथम क्रमांक पटकाविले आहे. तसेच रायगड जिल्हास्तरीय २०१८ च्या स्पर्धेत शारदा धुळप यांच्या 'साहित्यआभा', २०१९ च्या स्पर्धेत अपर्णा कुलकर्णी- नाडगौडी यांच्या 'पर्ण', तर २०२० च्या स्पर्धेत दीपक म्हात्रे यांच्या 'आगरी दर्पण' या दिवाळी अंकांने प्रथम क्रमांकाचा मान मिळविला आहे, अशी माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत दिली. यावेळी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार निलाताई उपाध्ये, स्पर्धा संयोजक दीपक म्हात्रे, आदी उपस्थित होते.
राज्यस्तरीय २०१८ च्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक 'चतुरंग अन्वय', तृतीय क्रमांक 'झपूर्झा', सर्वोत्कृष्ट बाळ दिवाळी अंक 'वयम', उत्कृष्ट विशेषांक 'ऍग्रोवन', उत्कृष्ट कथा 'चंद्रकांत', उत्कृष्ट व्यंगचित्र ' हास्यधमाल', उत्कृष्ट मुखपृष्ठ 'दीपावली', सन २०१९ च्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक(विभागून) 'दीपावली' आणि ' पुरुष उवाच' , तृतीय क्रमांक (विभागून) 'दुर्ग-शोध गडकिल्यांचा' आणि 'दुर्गाच्या देशातून', उत्कृष्ट विशेषांक 'समपथिक', उत्कृष्ट कविता 'खोडलेली कविता-कालनिर्णय', उत्कृष्ट व्यंगचित्र 'दीपावली', उत्कृष्ट मुखपृष्ठ 'चतुरंग अन्वय', उत्कृष्ठ अंतर्गत सजावट 'अक्षरधारा' तर सन २०२० च्या स्पर्धेत 'संवादसेतू' व ' आंतर-भारती' या अंकांनी विभागून द्वितीय क्रमांक, ' कुबेर' व ' ओंजळीतील अक्षरे' या अंकांनी विभागून तृतीय क्रमांक, सर्वोत्कृष्ट बाळ दिवाळी अंक 'छावा', उत्कृष्ट विशेषांक 'तेजोमय', उत्कृष्ट कथा 'पॉपी टिअर(व्यासपीठ)', उत्कृष्ट कविता 'सकाळ- खरवडून पाहीन म्हणते', उत्कृष्ट व्यंगचित्र 'आक्रोश (संजय मिस्त्री)', उत्कृष्ट मुखपृष्ठ 'दीपावली', उत्कृष्ठ अंतर्गत सजावट 'किल्ला' या अंकांने पटकाविला आहे. तर रायगड जिल्हास्तरीय २०१८ च्या स्पर्धेत 'लोकसेवक' अंकाने द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक 'उरण समाचार', सन २०१९ च्या स्पर्धेत 'उरण समाचार' ने द्वितीय तर तृतीय क्रमांक वादळवारा अंकाने तसेच सन २०२० च्या स्पर्धेत 'इंद्रधनु' ने तर 'रामप्रहर' अंकाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे, अशी माहिती देण्यात आली. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार नीलाताई उपाध्ये, अरविंद कुलकर्णी, प्रा. डॉ. दीपा ठाणेकर, महेश कुलसंगे, प्रा. नम्रता पाटील, सुनिल कर्णिक, प्रा. डॉ. अलका मटकर, प्रा. जयप्रकाश लब्दे, विजय कुलकर्णी, प्रा. वर्षा माळवदे, नम्रता कडू, रामदास खरे, प्रतिष्ठा सोनटक्के यांनी काम पाहिले असून परिक्षणाचा दर्जा सातत्याने राखण्यासाठी परिक्षकांच्या परिक्षणामध्ये कोणताही हस्तक्षेप केला जात नसल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले.
राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमधील विजेत्या प्रथम क्रमाकांस ७५ हजार रुपये, व्दितीय क्रमाकांस ३५ हजार तर तॄतीय क्रमाकांस २० हजार रूपये तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील उत्कॄष्ट कथेसाठी ०७ हजार रूपये, उत्कॄष्ट कविता व उत्कॄष्ट व्यंगचित्रास प्रत्येकी २५०० रूपये, उत्कृष्ट विशेषांकास ०५ हजार रुपये, उत्कृष्ठ मुखपृष्ठ ०५ हजार रुपये, त्याचबरोबर बालसाहित्याच्या सवोत्कॄष्ट अंकास ७५०० रूपये तसेच रायगड जिल्हयातून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांसाठी खास पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये प्रथम क्रमांकास ३० हजार रूपये, व्दितीय क्रमांकास १५ हजार रूपये आणि तॄतीय क्रमाकांस ७५०० रूपये, आणि सर्व पुरस्कारप्राप्त अंकांना सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप असून मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना २५ डिसेंबरला होणाऱ्या सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कितीही संकटे आली तरी दिवाळी अंकांच्या ११० वर्षांच्या परंपरेत खंड पडलेला नाही. वाचकांची संख्या घटत आहे, अशी ओरड दरवर्षी होते, मात्र तसे न होता यंदा दिवाळी अंकांना विक्रमी मागणी आली आहे. त्यामुळे हि अंक निर्माते, साहित्य दर्दी वाचकांसाठी सुखावह बाब असून हि साहित्य परंपरा अखंडित ठेवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले.