भव्य मिरवणुक, आकर्षक चित्ररथ
पनवेलनगरी शिवमय
पनवेल,दि.19 : “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा जयघोषात, ढोल- ताशा आणि लेझीमच्या गजरात आज पनवेल नगरी दुमदुमली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्ताने पनवेल महानगरपालिके तर्फे लोकसहभागातून भव्य – दिव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त मंगेश चितळे, तसेच माजी सभागृह नेते परेश ठाकूर, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणा नंतर ढोल ताशाच्या गजरात भव्य – दिव्य अशा मिरवणूकीची सुरूवात झाली. या मिरवणूकीमध्ये पारंपारिक वेशभुषेमधील महिला, पुरुष, विद्यार्थी व विद्यार्थांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रांतील विविध प्रसंगाचे एकूण 7 चित्ररथ, महापालिकेच्या शाळा व खाजगी शाळा अशा विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचे 14 लेझीम पथक, ढोल पथक, बॅन्जो पथक याचा समावेश होता. दांडपट्टा तलवारबाजी लेझीम अशा शिवकालीन मैदानी खेळांचे (पाच ठिकाणी ) सादरीकरण करण्यात आले. ही कला सादरीकरण करणाऱ्या कलावंतांनी उपस्थित शिवप्रेमींची मने जिंकली.
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्याजवळून निघालेली ही मिरवणूक– हुतात्मा स्मारक चौक – आदर्श लॉज – लाईन आळी – लोकनेते दि.बा.पाटील प्राथमिक शाळा – गावदेवी मंदिर – स्वा. सावरकर चौक – बापटवाडा चौक – महानगरपालिका कार्यालय – सेवा योजन कार्यालय – बंदर रोड चौक – मौलाना आझाद चौक या मार्गाने निघून छत्रपती शिवाजी महाराज अर्धाकृती पुतळा टपाल नाका येथे आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या मिरवणूकीची सांगता झाली.
छत्रपतींचा जयघोष
यानंतर पुढील कार्यक्रमांसाठी मिरवणूकीतील सहभागी स्पर्धक, नागरिक व महापालिका अधिकारी व कर्मचारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात एकत्रित येताच छ.शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघे नाट्यगृह दुमदुमले. अशा भारलेल्या वातावरणामध्ये यशवंत जाधव व सहकारी यांनी आपल्या पहाडी आवाजात सादर केलेल्या पोवाड्यांनी सर्वांच्या अंगावर शहारे आले. आमदार महोदयांनी यावेळी शाहिरास विशेष पारितोषक दिले. त्यानंतर महानगरपालिका मालमत्ता कर विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यावरील नाट्याचे अत्यंत नेत्रदीपक देखणे असे सादरीकरण करण्यात आले. उपायुक्त स्वरूप खारगे यांनी यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या सादरीकरणाने उपस्थित भारावले.
विशेष सन्मान
नुकत्याच जाहीर झालेल्या माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये पनवेल महानगरपालिकेने यश मिळवत अमृत गटामध्ये राज्यामध्ये सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक कायम राखला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत घेण्यात आलेल्या सेवाकर्मी पुरस्कार कार्यक्रमामध्ये सर्वोत्कृष्ठट महानगरपालिका म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तसेच 150 दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन मूल्यमापनात ‘सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त’ म्हणून देखील पनवेल महानगरपालिका आयुक्तांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. या उत्तुंग आणि सातत्यपूर्ण यशासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनपा आयुक्त मंगेश चितळे यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान केला. तसेच लोकसहभागातून साजऱ्या केलेल्या या शिवजयंतीस आमदार विक्रांत पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, महापौर नितीन पाटील व माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी प्रत्येकी 1 लाख रुपयांची रक्कम दिली. करिता त्याचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
मान्यवरांच्या शुभहस्ते मिरवणूकीत सादरीकरणात विजेते ठरलेल्या लेझीम पथकांना व चित्ररथांना पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपायुक्त कैलास गावडे यांनी केले.
या सर्व कार्यक्रमास नवनिर्वाचित सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, महापालिका व इतर शाळांचे शिक्षक व विद्यार्थी पनवेल शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, शिवप्रेमीनागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिरवणुकीतील बक्षीस विजेते
चित्ररथ स्पर्धा
प्रथम पारितोषिक – पनवेल महानगर पालिका शिक्षण विभाग (रुपये 30 हजार व सन्मानचिन्ह)
द्वितीय पारितोषिक – रयत शिक्षण संस्थेचे लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालय, कामोठे (रुपये 20 हजार व सन्मानचिन्ह)
तृतीय पारितोषिक – व्ही के हायस्कूल, पनवेल (रुपये 15 हजार व सन्मानचिन्ह)
उर्वरित सहभागी संघांना प्रोत्साहानपर 10 हजार प्रत्येकी
लेझीम स्पर्धा (खाजगी शाळा, मोठा गट)
प्रथम पारितोषिक – आगरी शिक्षण संस्था, खांदा कॉलनी (रुपये 10 हजार व सन्मानचिन्ह)
द्वितीय पारितोषिक – केईएस इंदुबाई वाजेकर स्कूल, पनवेल (रुपये 7 हजार व सन्मानचिन्ह)
तृतीय पारितोषिक – महात्मा इंटरनैशनल स्कूल, खांदा कॉलनी (रुपये 5 हजार व सन्मानचिन्ह)
उर्वरित सहभागी संघांना प्रोत्साहानपर (रुपये 5 हजार प्रत्येकी)
लेझीम स्पर्धा (छोटा गट)
प्रथम पारितोषिक – मनपा शाळा क्र 6 (रुपये 10 हजार व सन्मानचिन्ह)
द्वितीय पारितोषिक – मनपा शाळा क्र 2 (रुपये 7 हजार व सन्मानचिन्ह)
तृतीय पारितोषिक – जिल्हा परिषद शाळा, तळोजे केंद्र (रुपये 5 हजार व सन्मानचिन्ह)
उर्वरित सहभागी संघांना प्रोत्साहानपर (रुपये 5 हजार प्रत्येकी)
उत्कृष्ठ वेशभूषा
इंदुबाई वाजेकर स्कूल, पनवेल

![]()
