पनवेल दि.12: देशाची ताकद वाढणारी आयएनएस विक्रांत युद्धनौकेची माहिती सर्वाना अवगत व्हावी, यासाठी आयएनएस विक्रांत या युध्द जहाजाची प्रतिकृती महाराष्ट्राचे केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयात प्रदर्शनाच्या रूपाने पहायला मिळणार असून आज राजमाता जिजाऊ साहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.
संस्कार भारती (कोकण प्रांत) व ओरायन मॉल पनवेल आणि महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात संपूर्ण भारतीय बनावटीची सर्वात मोठी युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’च्या प्रतिकृती प्रदर्शन मुंबई येथे दिनांक १३ ते २० जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने मंत्रालयाच्या नवीन इमारतीत त्रिमूर्ती प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि संस्कार भारतीचे केंद्रीय संरक्षक राजदत्त, राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष वासुदेव कामत, ज्येष्ठ कलाकार आणि संस्कार भारतीचे कोकण प्रांत अध्यक्ष सुनिल बर्वे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार संजय शिरसाट, ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, नेव्ही फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी कमांडर विजय वडेरा, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, संस्कार भारतीचे महामंत्री अँड. अमित चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, यांच्यासह संस्कार भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते.