केअर ऑफ नेचर संस्थेच्या माध्यमातून सर्प जनजागृती
उरण दि ८ (विठ्ठल ममताबादे) सण,संस्कृती, परंपरा आणि विविधतेने नटलेल्या भारत देशात आज पण अध्यात्माला विज्ञानची जोड देत प्रगतीचे नवं – नवीन राजमार्ग उभे केले जात आहेत ! आज पण देशाच्या विविध भागांत आपल्या परंपरे नुसार सण संस्कृती जपल्या जात आहेत.त्यातच देशात आणि खास करून महाराष्ट्रात साजरे होणाऱ्या सणांचं महत्त्व काही वेगळचं आहे! वर्षा ऋतूतील श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नाग पंचमी हा सण श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी येतो पौराणिक कथेत असं म्हटलं आहे की भगवान श्री कृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना पात्रातून सुरक्षीत वर आले तो दिवस म्हणजे श्रावण शुध्द पंचमीचा होता !.
या सणाला जितकं अध्यात्मिक महत्त्व आहे तितकंच महत्त्व वैज्ञानिक दृष्टीकोनातून सुद्धा आहे.भूत दया परमो धर्म ची शिकवण देणारा हा सण. पशु पक्षांची पूजा करायला शिकवतं तर प्राणीमात्रांवर दया करायला देखील भाग पाडतं ! त्याला जोडून ह्या सणांचं वैज्ञानिक महत्त्व देखील अनन्यसाधारण असच आहे ! येथे सापांसारख्या जीवजंतूंची पूजा केली जातेय कारण खऱ्या अर्थाने साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे शेतीला नुकसान पोहचवण्याऱ्या जीवांना तो खाऊन संपविण्याचा काम करतो आणि म्हणूनच नाग पंचमी हा सण सापांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे.
त्याच बरोबर वैज्ञानिक दृष्टीकोनातून महत्त्व असणाऱ्या ह्या जीवांबद्दल म्हणजेच सापांबद्दल लोकांत अजूनही असणारे समज आणि गैरसमज ह्या बद्दलची जनजागृती करण्या करिता ह्या समाजात आज पण अनेक प्राणीमित्र संघटना, वन्यजीव प्रेमी व्यक्तीमत्व आपलं अनमोल असं योगदान देत असतात. त्यातलाच एक नाव केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर आणि त्यांच्या संपूर्ण वन्यजीव प्रेमी टीमने आज पर्यंत आठ हजारच्या वर सापांना जीवदान दिलं आहे त्यांना त्यांच्या अधिवासात सोडलं आहे त्याच बरोबर समाजात सापांबद्दल जनजागृती व्हावी म्हणून “साप समज आणि गैरसमज” ह्या व्याख्यानरुपी प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून आज पर्यंत पंधराशेच्या वर मोफत व्याख्यान सादर करून अनेक गावांत शाळां-कॉलेजातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून खऱ्या अर्थाने या सणाच्या अनुषंगाने राजू मुंबईकर यांच्या केअर ऑफ नेचर या संस्थेच्या माध्यमातून व्याख्याने, प्रबोधनपर कार्यक्रम यांच्या माध्यमातून समाजात भूत दयेची शिकवण दिली जात आहे. अशा प्रकारे केअर ऑफ नेचरचे संस्थापक राजू मुंबईकर व संस्थेचे पदाधिकारी सदस्यांनी सापा बद्दल गैरसमज दूर करून त्यांचे जीव वाचवून, समाजात जनजागृती करतात त्यामुळे खऱ्या अर्थाने केअर ऑफ नेचर या संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर व त्यांच्या टीमने खऱ्या अर्थाने नागपंचमी एक दिवस नाही तर दररोज साजरी करतात.