दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेचा हृदयस्पर्शी उपक्रम
पुणे दि.१२: नुकतेच सेनापती बापट मार्गावरील कामायनी संस्थेच्या मुनोत हॉल मध्ये “यशोवाणी” वाचक स्वयंसेवकांचा वार्षिक मेळावा “यशोवाणी- स्नेहभेट २०२४” शनिवार दिनांक १० ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला. प्राची गुर्जर संचालित यशोवाणी ही संस्था गेली १६ वर्षे दृष्टिबाधित व्यक्तींसाठी पुस्तके विनामूल्य ध्वनिमुद्रित करून देण्याचे काम करत आहे. ह्या कामात आपले योगदान देणारे, १५० वाचक स्वयंसेवक ह्या मेळाव्याला उपस्थित होते. साधना टेम्भेकर ह्यांनी नेत्रदानाविषयी विषयी माहिती सांगितली आणि नंतर सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प केला.
ह्या मेळाव्यातील सकाळच्या सत्रात यशोवाणीचे विद्यार्थी सिद्धी कुंजीर व सौरभ चौगुले ह्यांची माधवी कुलकर्णी ह्यांनी तर तपस्या व नरेंद्र साठे ह्या दृष्टिबाधित पतिपत्नींची शलाका आपटे ह्यांनी मुलाखत घेतली.
स्वतःचे youtube channel असलेल्या गायिका सिद्धी कुंजीरने कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेशवंदना म्हणून उपस्थितांची दाद मिळवली. अभ्यास करताना यशोवाणीने उपलब्ध करून दिलेल्या पुस्तकांचा फायदा झाल्याचे सांगितलेच आणि वाचक स्वयंसेवकांसाठी उपयुक्त सूचनाही केल्या. तंत्रज्ञान दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना स्वावलंबी होण्यासाठी किती उपयोगी पडते हे Tech Savvy सौरभशी मारलेल्या गप्पातून जाणवले. दृष्टिबाधित मुले मोबाइल कसा वापरतात ह्याचे प्रात्यक्षिकच त्याने दाखवले. स्वतःचा ट्रॅव्हलॉग असणाऱ्या सौरभने शूटिंग, एडिटिंग, मिक्सिंग अशी सगळी कामे तो कशी करतो हे सांगितले. दोघांची जिद्द, सकारात्मकता ही, छोट्या छोट्या अपयशांनी खचून जाणाऱ्या आजच्या तरुणाईच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली.
वकील, गायक नरेंद्र आणि कॅनरा बँकेत नोकरी करणारी त्याची सहचरी तपस्या ह्या दोघांशी झालेल्या गप्पन मधून उपस्थितांवर हास्याचा, आत्मीयतेचा, आनंदाचा प्रसन्न शिडकावा म्हणजे केला
बालपण, शिक्षण, नोकरी, लग्न, ते आज एका मुलाचे आईबाबा असा दोघांचाही प्रवास ह्या गप्पातून उलगडला. मुलाच्या अंधत्वाची जाणीव झाल्यावर, कल्पनेतील सगळ्या अडचणींना “फक्त दिसतच तर नाहीये” इतके सोपे उत्तर देणारे नरेंद्रचे आई -बाबा तसेच दृष्टिबाधित मुलीला सर्वार्थाने उमलू देणारे, स्वतःचे निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य देणारे, स्वावलंबी करणारे तपस्याचे पालक म्हणजे सुजाण पालकत्वाची उदाहरणेच.
“दृष्टिबाधित ह्या शब्दाशी जोडलेले अंधःकार, अडचणी, परावलंबी, बिचारे हे शब्द किती एकांगी आहेत हेच ह्या चौघांशी मारलेल्या गप्पातून जाणवले.
दुपारच्या सत्रात यशोवाणीच्या संस्थापिका प्राची गुर्जर ह्यांनी यशोवाणीच्या कामाचे स्वरूप सांगितले आणि स्वावलंबी असणे ही स्वाभिमानी, सन्मानपूर्वक जगण्याची प्राथमिक गरज आहे आणि दृष्टिबाधित मुलांनी स्वावलंबी होण्याचा मार्ग ज्या शिक्षणातून जातो तिथे शक्य ती मदत करणे हे यशोवाणीचे उद्दिष्ट आहे हे स्पष्ट केले.
“स्पर्शज्ञान” ह्या ब्रेल मासिकाचे संपादक- प्रकाशक, दृष्टीबाधित कलाकारांना घेऊन “अपूर्व मेघदूत” सारख्या नाट्यकृती घडवणारे प्रसिद्ध नाट्यकर्मी स्वागत थोरात सरांच्या बोलण्यातून दृष्टिबाधित मुलांच्या क्षमतांविषयी असलेले बरेच गैरसमज दूर झाले. त्यांनी बसवलेल्या नाटकांच्या चित्रफिती बघताना, त्यातील कलाकारांचा अभिनय, रंगमंचावरील सहज वावर बघून सगळेच चकित झाले. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातच ह्या व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून काही करण्याचा विचार करणे आणि तो कृतीत आणणे हा समाजसेवेचा मूलभूत महत्वाचा मार्ग त्यांनी सांगितला.
अनुराधा कुलकर्णी आणि सुनीती पारुंडेकर ह्यांनी, कार्यक्रमाच्या निवेदनातून यशोवाणीचा प्रवास टप्प्याटप्प्याने उलगडला.
२० वर्षांपूर्वी प्राची गुर्जर ह्या एकट्या व्यक्तीने दृष्टिबाधित मुलांना पुस्तके वाचून दाखवण्यातून सुरु झालेला हा प्रवास, आज जवळजवळ ४०० वाचक स्वयंसेवक आणि मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत ह्या भाषांमधील शालेय ते स्पर्धापरीक्षांपर्यंतची ५००० ध्वनिमुद्रित पुस्तकांपर्यंत पोहोचला आहे. एका विद्यार्थ्यांसाठी पण एखाद्या पुस्तकाचेच नव्हे तर साध्या कागदावर लिहिलेल्या मजकुराचे पण रेकॉर्डिंग यशोवाणीत होते. अभ्यासक्रमाच्या पुस्तकांव्यतिरिक्त रोजची वर्तमानपत्रे, ललित साहित्य, ह्यांचे ध्वनिमुद्रण हे “यशोवाणी स्टुडन्ट ग्रुप “यशोवाणी साहित्य ग्रुप” ह्या whatsapp ग्रुपवर रोज पोस्ट केले जाते’ गणित, accountancy, इकॉनॉमिक्स ह्या विषयांसाठी त्या त्या विषयातील जाणकार वाचक स्वयंसेवक ऑडिओ ट्युटोरिअल्स तयार करतात.
शेवटी अशा समाजोपयोगी कामासाठी मुनोत हॉल नि:शुल्क उपलब्ध करून देणाऱ्या कामायनी संस्थेचे आभार योगेश पाटील ह्यांनी मानले आणि राष्ट्रगीताने ह्या कार्यक्रमाची सांगता झाली.
Prachi Gurjar
(Mob: 9011041817)

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!