अलिबाग,दि.10 : भारतीय हवामान विभागाने दि.9 ते 12 जून या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे.
या कालावधीत अतिपर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यात जीवित व आर्थिक हानी होऊ नये, या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापनामार्फत सर्व प्रशासकीय विभागांना आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
तरी देखील भारतीय हवामान विभागाने वर्तविलेली शक्यता तसेच या संदर्भात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी दि. 8 जून 2021 रोजीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व अतिवृष्टीमुळे होणारी जीवित व आर्थिक हानी टाळण्यासाठी दि.10 व 11 जून 2021 या दोन दिवशी अत्यावश्यक सेवेशी निगडीत बाबींसहीत सर्व दुकाने / आस्थापना बंद ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरुन अतिवृष्टीच्या काळात नागरिक घराबाहेर पडणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला.
यानुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.
1. रायगड जिल्ह्यात दि.10 ते दि.11 जून 2021 या कालावधीत वैद्यकीय सेवेशी निगडीत बाबी उदा . दवाखाने / हॉस्पिटल / मेडीकल / पॅथोलॉजी इ . दुकाने / आस्थापना व्यतिरिक्त इतर सर्व दुकाने / आस्थापना पूर्णतः बंद राहतील.
2.जिल्ह्यात दि.10 ते 11 जून या कालावधीत अत्यावश्यक बाबी व्यतिरिक्त अन्य कारणासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई राहील.
3. या कालावधीत सर्व शासकीय कार्यालये मात्र सुरु राहतील.
या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबाजवणी करुन नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
तसेच या आदेशाची अंमलबजावणी नागरिकांमार्फत काटेकोरपणे केली जाईल, या दृष्टीने आवश्यक नियोजन व उपाय योजना जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी कराव्यात, असे आदेश त्यांनी शासकीय यंत्रणांना दिले आहेत.
त्याचबरोबर या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / आस्थापना शासनाने यापूर्वी लागू केल्यानुसार दंडात्मक कारवाईस तसेच भारतीय दंड विधान संहिता कलम 188 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतूदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.