पनवेल दि.१९: सिडकोने देवस्थानाच्या संस्थांना नाममात्र दरात भूखंड दिले आहे त्याचप्रमाणे उलवेनोडमध्ये अटलसेतू जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी उभारण्यासाठी भूखंड न दिल्यास सिडको आणि आमदारांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल, असा ईशारा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज उलवेनोड येथे दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्या वतीने उलवे नोड येथे भव्य शिवजयंती उत्सव संपन्न झाला. त्यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना म्हंटले कि, महाराष्ट्र धर्म वाढविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अपरिमित त्याग केला. त्यामुळे शिवरायांची जयंती साजरी करणे आपले कर्तव्य आहे. उलवेनोड मध्ये महाराजांचा अश्वारूढ पुतळा व शिवसृष्टी उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची २०१८ मध्ये स्थापना करण्यात आली. आणि त्या अनुषंगाने छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा करूनही सिडको या पवित्र कार्यासाठी भूखंड देत नाही, उलट या समाजोपयोगी भूखंडासाठी सिडको पाच कोटी रुपये आपल्याकडून मागत आहे. त्यामुळे सिडकोच्या या भूमिकेचा धिक्कार व्यक्त करत आहे. सरकार सहानुभूतीशीर आहे पण सिडकोचे अधिकारी हे झारीतले शुक्राचार्य आहेत. तिरुपती मंदिरासाठी १ रुपये दराने जागा दिली गेली आहे, पण आपल्याकडून मात्र पैशांची मागणी केली जात आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे कार्य अत्यंत पवित्र असून, कोणत्याही अडथळ्यापासून ते रोखले जाऊ नये. हा महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा गौरव आहे. त्यामुळे २६ जानेवारी २०२७ पर्यंत भूखंड मिळाला नाही तर सिडको त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या घरावर मोर्चा काढू,असे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमूद केले.
यावेळी महेंद्र घरत म्हणाले, जगाचे मॅनेजमेंट गुरू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांचा जगालाही सार्थ अभिमान आहे. ज. आ. भगत साहेब यांनी १९८१ मध्ये शिवरायांचा पुतळा कोपर फाट्यावर उभारला आहे. आता आपल्याला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा अटल सेतू जवळच उभारायचा आहे. कारण रयतेचे राजे एकच म्हणजे शिवाजी महाराज. महिलांचा सन्मान करणारे एकमेवाद्वितीय शिवाजी महाराज. त्यांच्यामुळेच आपण आज सन्मानाने जगतोय. त्यामुळे शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारणे ही आपली अस्मिता आहे. सिडकोच्या एमडींना तीन वेळा येथे आणले आपला इतिहास हा आंदोलनांचा आहे. जर एक रुपया दराने भूखंड मिळाला नाही, तर सिडकोच्या अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर एकदा ठरवतात ते कार्य पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत, त्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि शिवसृष्टी उभारल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असेही ठामपणे अधोरेखित करण्यात आले.
सकाळी गव्हाणहून वाद्यगजर, भगवे ध्वज आणि “शिवरायांचे जयघोष” करत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक उलवे नोडमधील खारकोपर रेल्वे स्थानकाजवळील रामशेठ ठाकूर मैदानात पोहोचली, जिथे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते. मुख्य जयंती सोहळ्यात शिवप्रतिमेचे पूजन, माल्यार्पण आणि अभिवादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, तसेच भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, समितीचे अध्यक्ष वसंत पाटील, पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, वितेश म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, जयवंत देशमुख, रविशेठ पाटील, विश्वनाथ कोळी, हेमंत ठाकूर, अनंता ठाकूर, अशोक कडू, गजानन घरत,चिंतामणी घरत,भार्गव ठाकूर, साईचरण म्हात्रे, योगिता भगत, मीनाक्षी पाटील, ज्योत्स्ना ठाकूर, किशोर पाटील, यांच्यासह उपस्थित शिवप्रेमींनी केले. मान्यवरांनी युवकांना आवाहन केले की, शिवचरित्राचा गौरव करत, शिवरायांचे विचार आणि आदर्श जीवनात आत्मसात करावे आणि समाजाच्या कल्याणासाठी पुढाकार घ्यावा. या उत्सवात परिसरातील ग्रामस्थांनी आणि विविध सामाजिक संस्थांनी सक्रिय सहकार्य दिले, ज्यामुळे कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्थापन जयंती समितीने उत्कृष्टरित्या केले. उलवे नोडमधील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव हा स्थानिक समाजासाठी प्रेरणादायी आणि ऐतिहासिक संस्कृती जपण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे. या उत्सवासाठी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समिती तसेच गव्हाण, कोपर, शेलघर, शिवाजीनगर, बेलपाडा, न्हावा, न्हावाखाडी, उलवे, वहाळ, मोरावे, बामणडोंगरी, जावळे व उलवेनोड येथील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
![]()
