Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps
माथेरान (मुकुंद रांजाणे) निसर्ग सौंदर्य आणि माथेरान एक दृढ नाते बनले आहे. या माथेरानच्या सभोवताली असणाऱ्या खोल खोल दऱ्या आणि त्यावरून निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचे नयनरम्य दृश्ये न्याहाळत असताना मनाला उभारी आणि अंगातील क्षीण केव्हा नाहीसा होतो ते कळत नाही. उंचावर वसलेल्या या ठिकाणी गर्द झाडी आणि त्यातूनच लाल मातीच्या रस्त्यावरून पायी मार्गक्रमण करताना एक वेगळाच अनुभव भरपूर काही सांगून जातो. पावसाळ्यात माथेरानला येणं म्हणजे एक पर्वणीच असते. नेरळ येथूनच पायी चालत येताना घाटरस्त्यात जवळपास तीन हजार फूट उंचीवरून पडणारे धबधब्याच्या स्वरूपात शुभ्र तुषार, संपूर्ण डोंगराने जणू काही हिरवा शालू परिधान करून एखाद्या नवलाईला साजेसा पेहराव पावसांच्या तुषारांनी हिरवागार झालेला पहावयास मिळतो. एखाद्या छोट्याशा धबधब्याच्या खाली मनसोक्त पणे ओलेचिंब होऊन निसर्ग आपल्याशी संवाद साधत असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. उंचावरून पडणारे जलप्रपात आणि वाऱ्याच्या लहरींनी सारा परिसर स्वच्छ आणि निर्मळ मनाला भुरळ घालत असतो. माथेरानला आल्यावर जवळपास असणाऱ्या पॉईंट्स वरून नयनरम्य देखावे आणि खळखळणारे शुभ्र झरे समोरील डोंगरावर असणारी गर्द झाडी त्यातून पक्षांचा किलबिलाट ऐकावयास मिळतो. बाजारपेठेत गारवा घालवण्यासाठी मका कणीस, भजी, चहा पिऊन मन अगदी तृप्त होऊन जाते. पावसाळ्यात एक दिवस पिकनिक साठी माथेरान अत्यंत स्वस्त आणि मुंबई पुण्यापासून अगदीच जवळचे पर्यटनस्थळ आहे त्यामुळे इथे आल्याशिवाय गत्यंतर नाही.