पोलादपूर दि.१० (शैलेश पालकर) तालुक्यातील कापडे खुर्द माळवाडी येथील स्वातंत्र्यसैनिक बाबाजी रामचंद्र निकम यांचे वयाच्या 90 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. ग्रामीण भागातून देशाच्या स्वातंत्र्यलढयातील एक सत्याग्रही सैनिक बुधवारी रात्री काळाच्या पडद्याआड लोप पावला. गुरूवारी स्वातंत्र्यसैनिक बाबाजी निकम यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारप्रसंगी उपस्थित राहून शासनातर्फे स्वातंत्र्यसैनिक निकम यांना श्रध्दांजली वाहून पोलादपूरचे निवासी नायब तहसिलदार समीर देसाई यांनी शासनाकडून रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अंत्यसंस्काराचे अनुदान दिवंगत स्वातंत्र्यसैनिक बाबाजी निकम यांच्या पत्नीस त्वरित देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
पोलादपूर तालुक्यातील आड-चांभारगणीतील डांगे, रायतळवाडी गणपत बुरटे, कापडे बुद्रुकचे गोविंद चव्हाण यांच्यासह कापडे खुर्द येथील स्वातंत्र्यसैनिक बाबाजी निकम यांनी त्यांच्या तरूणपणी ब्रिटीश सरकारविरोधात असहकार चळवळ आणि चलेजाव आंदोलनामध्ये सहभाग घेतला. पोलादपूर पंचायत समितीच्या ध्वजस्तंभावरील स्वातंत्र्यसैनिकांच्या नामावलीमध्ये बाबाजी निकम यांचा उल्लेख दिसून येत आहे.
बुधवारी रात्री उशीरा वृध्दापकाळाने बाबाजी रामचंद्र निकम यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आहेत. पोलादपूर तालुक्यातील सर्वात ज्येष्ठ आणि करारी व्यक्तीमत्व म्हणून बाबाजी निकम यांच्याकडे आदराने पाहिले जात असे. स्वातंत्र्यसैनिक बाबाजी निकम यांच्या अंत्यसंस्काराला पोलादपूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होता.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!