पनवेल दि.०१: पनवेल येथून अंधेरी येथे जाणाऱ्या रेल्वेसेवेला आता गोरेगाव पर्यंत नेण्यासाठी पनवेल प्रवाशी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले. आज हिरवा कंदील दाखवून या रेल्वेसेवेचा शुभारंभ भारतीय रेल्वेचे सल्लागार समिती सदस्य अभिजित पां. पाटील, डॉ.भक्तिकुमार दवे यांच्याहस्ते झेंडा दाखवून करण्यात आला.
पनवेल येथून हार्बर मार्गाने मुबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे जाणारी पहिली हार्बर रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर पनवेलसह नवी मुंबईच्या विकासाला गती मिळाली. कालांतराने येथील लोकवस्ती वाढली आणि प्रवाशी संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. प्रवाशांना अनेक अडचणी येवू लागल्या आणि याची दखल पनवेल प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष डॉ.भक्तीकुमार दवे यांनी घेवून पाठपुरावा करून ही रेल्वे सेवा अंधेरी पर्यंत जाण्यासाठी प्रवाशांच्या सेवेत आणली. मात्र सदर रेल्वेसेवा बोरिवली जंक्शन पर्यंत पोहचविण्यासाठी धडपडणाऱ्या प्रवाशी संघटनेच्या प्रयत्नांना काही अंशी यश मिळाले . आज दिनांक ०१ डिसेंबर २०२१ रोजी पनवेल स्थानकातून अंधेरी येथे जाणारी रेल्वे गोरेगांवपर्यंत जाण्यासाठी सज्ज झाली. यावेळी भारतीय रेल्वेच्या सल्लागार समितीचे सदस्य अभिजित पां. पाटील, प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष डॉ. भक्तिकुमार दवे, श्रीकांत बापट, राष्ट्रवादीचे नेते सुदाम पाटील, पनवेल रेल्वे प्रबंधक श्री.मीना आदींनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ केला.