पनवेल,दि.19 : पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात होणारी वाढती लोकसंख्या आणि शैक्षणिक गरज लक्षात घेता तळोजा नोड परिसरात विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक आणि उच्च दर्जाचे शैक्षणिक संकुल उभारले जाणार आहे. प्लॉट क्र. ०६, सेक्टर ७, तळोजा गाव येथे हा नवा शैक्षणिक प्रकल्प साकारला जाणार आहे. भविष्यातील आव्हानांचा विचार करून अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशी शाळा साकारण्यात येणार आहे.
या इमारतीमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये बेसमेंट + ग्राउंड + ६ मजले असे असून विद्यार्थ्यांसाठी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध राहणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी आरामदायी, आकर्षक आणि विद्यार्थी-अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी शाळेमध्ये एकूण ३५ (सोयीस्कर) वर्गखोल्यांचा समावेश करण्यात आला आहे. उत्कृष्ट पध्दतीने नियोजित केलेल्या या शैक्षणिक संकुलामध्ये प्रगत शैक्षणिक, सांस्कृतिक व विविध उपक्रमांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असणार आहेत.

शिक्षण प्रयोगशाळा
अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा आणि संशोधन कौशल्ये, डिजिटल साक्षरता व शैक्षणिक प्रगती वाढवण्यासाठी सुसज्ज ग्रंथालय या शैक्षणिक संकुलात उभारले जाणार आहे.

बहुउद्देशीय सभागृह
या शैक्षणिक संकुलामध्ये विविध शालेय कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम, इनडोअर खेळ, सभा आणि सामुदायिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मोठे व बहुउद्देशीय सभागृह उभारले जाणार आहे.

बस पार्किंगची व्यवस्था
या शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थ्यांना विविध सुविधां देण्यात येणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतुकीसाठी स्वतंत्र बस पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.

तळोजा व पनवेल परिसरातील नागरिकांच्या वाढत्या शैक्षणिक मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेच्यावतीने बांधण्यात येणारी ही नवी शाळा महत्त्वाची ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या नवोदित उपक्रम, शिस्त आणि सर्वांगीण विकासाला चालना देणारे हे संकुल पनवेल महापालिकेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बांधिलकीची निशाणी ठरणार आहे. आधुनिक सुविधा, सुरक्षा मानके आणि प्रगत शैक्षणिक सोयींसह ही शाळा नियोजित असून येत्या काही दिवसांमध्ये ही शाळा महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!