पनवेल,दि.९: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये पनवेल महानगरपालिकेस केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाची सर्वोच्च मान्यता असलेले ‘वॉटर प्लस’ शहर प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. याबरोबरच कचरामुक्त शहरांसाठीचा (जीएफसी) ३ स्टार दर्जा पनवेल शहरास प्राप्त झाला आहे.
देशातील ४००० पेक्षा जास्त शहरांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये सहभाग घेतला होता. देशातील ५८ शहरांना यावर्षी वॉटर प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील १८ शहरांना वॉटर प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. रायगड जिल्ह्यात वॉटर प्लस नामांकन सर्व प्रथम पनवेल महानगरपालिकेस मिळाले आहे. याचबरोबर जीएफसी रेटिंग अर्थात कचरामुक्त शहरांमध्ये पनवेल महापालिकेने मागीलवर्षी प्रमाणे आपला ३ स्टार रेटिंगचा दर्जा टिकवून ठेवला आहे.
वॉटरप्लस मानांकन हे ओडिएफ मानांकनातील सर्वश्रेष्ठ मानांकन आहे. पालिका क्षेत्रातील 5 मलनिस्सारण केंद्राद्वारे 100 टक्के मलयुक्त पाण्यावर प्रक्रियाकरून 20टक्के प्रक्रियाकृत पाण्याचा पुर्नवापर केला जातो.
महापालिकेने यावर्षी खरेदी केलेल्या दोन संक्शन कम जेटिंग मशीनद्वारे शहरातील मलनिस्सारण वाहिन्यांबद्दल तक्रार निवारणाला गती मिळाली आहे. वॉटर प्लस मानांकनात सफाई कर्मचाऱ्याची सुरक्षा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो ,पनवेल महानगरपालिकेने मशिनद्वारे स्वच्छेतला महत्त्व दिले असून प्रत्येक ठिकाणी मशिनीद्वारे सिवर व मॅनहोलची स्वच्छता केली जात आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयाची वेळोवेळी स्वच्छता व दुरूस्ती करण्यासाठी ‘स्वछता हर कदम’ ॲपद्वारे शौचालयांची देखरेख सुरु करुन शौचालयाच्या स्वच्छतेत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. अशा विविध उपाय योजनांमुळे पनवेल महानगरपालिकेस वॉटर प्लस हे मानांकन प्राप्त झाले आहे.
महापालिकेने वारंवार कचरा वर्गीकरणाबाबत केलेल्या आवाहनाला नागरिकांमधून प्राधान्याने महिला वर्गामधून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही कचरामुक्त शहरांसाठीचा (जीएफसी) ३ स्टार दर्जा पनवेल महापालिकेने टिकवून ठेवला आहे. यापुढेही नागरिकांनी अशा प्रकारे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेने केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!