पनवेल,दि.06 : पनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक आज पार पडली. पनवेल महानगरपालिकेची ही विशेष सर्वसाधारण सभा क्रमांक पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी, ठाणे डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल येथील “आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह” येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी अर्चना योगेश भोईर यांनी महापौर पदासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने महापौरपदी नितीन पाटील यांची पीठासीन अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवड केल्याचे जाहिर केले तसेच लिला रतन कातकरी यांनी उपमहापौर पदासाठी दाखल उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने उपमहापौरपदी प्रमिला पाटील यांची पीठासीन अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवड केल्याचे जाहिर केले.
नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांचा पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी ठाणे मा. डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ तसेच नवनिर्वाचित उपमहापौर प्रमिला पाटील यांचा मनपा आयुक्त मंगेश चितळे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी सर्व नवनिर्वाचित महापालिका सदस्य, आयुक्त मंगेश चितळे,अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसचिव नानासाहेब कामठे यांनी केले.

महापौर नितीन पाटील यांचा परिचय
पनवेल तालुक्यातील कासारभाट हे नितीन पाटील यांचे मूळ गाव. त्यांनी यापूर्वी दोन वेळा नगरसेवक म्हणून काम केले आहे. सभागृहातील त्यांचा अनुभव, विषयांची सखोल मांडणी आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. त्यांचा जनसंपर्क व्यापक व मजबूत असून नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी ते सदैव तत्पर असतात अशी त्याची ओळख आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी संघटनात्मक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अभिनव मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक सामाजिक, सांस्कृतिक व सेवाभावी उपक्रम राबवले आहेत. तसेच ‘जाणीव’ या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शिक्षण, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि गरजू घटकांसाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर महापौरपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

उपमहापौर प्रमिला पाटील यांचा परिचय
सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर कळंबोलीच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. श्रेया महिला बचत गट व नंदिनी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण करण्याचे भरीव कार्य त्यांनी केले आहे. महिलांच्या प्रश्नांची सखोल जाण आणि तळागाळातील महिलांशी थेट संवाद यामुळे महिलांपर्यंत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे पोहचविण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!