मुख्यालय व प्रभाग कार्यालयात यंत्रणा बसवली जाणार
पनवेल,दि.02 : नागरिकाभिमुख डिजिटल सेवांच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत पनवेल महानगरपालिकेने “स्मार्ट पे किऑस्क सिस्टीम” या अत्याधुनिक स्व-सेवा सुविधेचा शुभारंभ केला आहे. या या स्मार्ट किऑस्क मशीनचे उद्घाटन माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत नाट्यगृहात करण्यात आले. ही अत्याधुनिक डिजिटल सेवा सुरू करणारी पनवेल महानगरपालिका महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.
यावेळी महापौर नितीन पाटील विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला बालकल्याण सभापती ममता म्हात्रे, शिवसेना (उबाठा) गटनेत्या लिना गरड, महापालिका सदस्य, अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे,परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त स्वरूप खारगे,बँक ऑफ महाराष्ट्र चे अधिकारी , महापालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्मार्ट पे किऑस्क सिस्टीममुळे पनवेलमधील नागरिकांना मालमत्ता कर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक झाली आहे. नागरिक आता केवळ बिल स्कॅन करून काही क्षणांत कर भरू शकतात. तसेच मालमत्ता उतारा, थकबाकी नसल्याचा दाखला, अर्ज नोंदणी यांसारख्या विविध नागरी सेवा देखील या किऑस्कच्या माध्यमातून सहज उपलब्ध होणार आहेत.
या प्रणालीमध्ये “टॅप अँड पे” सारख्या डिजिटल पेमेंट पर्यायांचा समावेश असून, व्यवहारानंतर त्वरित पावती मिळते. त्यामुळे नागरिकांना रांगेत उभे राहण्याची गरज भासत नाही आणि वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होते.
यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, “पनवेल शहर झपाट्याने विकसित होत असून नागरिकांना आधुनिक व दर्जेदार सुविधा देणे ही काळाची गरज आहे. स्मार्ट पे किऑस्क सिस्टीम ही त्या दिशेने एक महत्त्वाची पायरी आहे.”
पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने सेवांचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला असून, भविष्यात “व्हॉइस इंटरॅक्शन” सारख्या तंत्रज्ञानाचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिक किऑस्कशी थेट संवाद साधून विविध सेवा सहज मिळवू शकतील.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!