आंदोलनात सहभागी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांचा निषेध केला.
पनवेल दि.२५: शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास फोल ठरलेल्या महाविकास आघाडीच्या फसव्या कारभाराविरोधात आज पनवेल भाजपाच्यावतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. सातबारा कोरा करा, महिलांवरील अत्याचार रोखा, जनतेचे पैसे लाटणाऱ्या बँकेवर कारवाई करा, असा आक्रमक पवित्रा यावेळी घेण्यात आला. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत, कर्नाळा बँकेकडून ठेवीदारांना पैसे मिळालेच पाहिजेत, तसेच शेतकरी कष्टकऱ्यांना दिलेले शब्द का पाळले जात नाहीत याची महाविकास आघाडी सरकारने जनतेला उत्तरे द्यावीत, अशीही जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. सकाळी १० वाजता सुरु झालेले हे धरणे आंदोलन दुपारी ०३ वाजेपर्यंत झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसिलदारांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले. या आंदोलनात कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृहनेते परेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल घरत यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.