पनवेल दि.21: खारकोपर, कामोठे, बामणडोंगरी व तळोजा येथील रेल्वेस्टेशन समोरील नियोजीत पार्किंग जागा व मैदानावर सिडकोने जबरदस्तीने पंतप्रधान आवास योजना राबविण्याचे कटकारस्थाना मुळे संतप्त झालेल्या दि.बा.पाटील सर्व पक्षीय संघटनेच्या नेत्यांनी, संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रखर विरोध केला.
सोमवार दि. २०जुलै २०२० रोजी साय ५.०० वाजता उलवा नोड मधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये सर्वपक्षीय संघटनेचे नेते, कार्यकर्ते व सिडकोचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील,संघटनेचे उपाध्यक्ष बबनदादा पाटील यांनी आमचा मास हाऊसिंग ला विरोध नाही मात्र सिडको संपादित शेकडो हेकटर जमीन बाजूला पडीक असताना, २१ व्या शतकातील सुंदर शहरांचे स्वप्न दाखविण्या-या सिडको प्रशासनाने आधीच्या नियोजनाचा खून करून पार्किंग व मैदानांच्या जागावर मास हाऊसिंगच्या शेकडो इमारती उभारण्याच्या प्रयत्न करून सुंदर शहरांची धारावी झोपडपट्टी करण्याचा चंग बांधला आहे. आधीच शहरे उभारताना दाखवलेली नागरी सुविधांचा स्वप्ने कागदावर राहिलेली आहेत. अपुरा पाणीपुरवठा, दोन लाख लोकसंख्या उलवे नोड मध्ये येऊन सुद्धा १० वर्षात एकही स्मशान भूमी व दफनभूमी नाही. बगीचे इतर सुविधा पुरवण्यात आलेले अपयश आणि त्यात अजून हजारो घरे उभारण्याचा मूर्खपणा याला आमचा विरोध आहे, गेली ३० वर्षे प्रकल्पग्रस्त गावांसाठी नागरी सुविधांवर एकूण उलाढालीच्या ५ % खर्च करण्याचे आश्वासन हवेतच विरलेले आहे. या व अनेक गोष्टीमुळे संतप्त झालेल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त व उलवे, कामोठे, तळोजे नोड मधील रहिवाश्यांनी प्रचंड संताप व्यक्त करून सिडको मास हाऊसिंगचे कामबंद पाडले आहे व कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पाची जागा न बदल्यास प्रकल्प होऊ देणार नाही असा सज्जड दम देण्यात आला.
या वेळी दि.बा.पाटील संघर्ष समितीच्या वतीने माजी खासदार रामशेठ ठाकूर, बबनदादा पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, महेंद्र घरत, अरुणशेठ भगत, रवीशेठ पाटील, राजेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, तर सिडकोच्या वतीने नवी मुंबई विमानतळाचे मुख्य अभियंता डायटकर, उलवे नोड मुख्य अभियंता गोडबोले, मुख्य नियोजनकर मानकर, कार्यकारी अभियंता रामोड व इतर अधिकारी उपस्थित होते व प्रकल्पग्रस्त गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.