सातारा दि.९ (हरेश साठे) कर्तृत्व, दातृत्व आणि समाजकारणाला महत्व देत सामाजिक जाणीव व बांधिलकी जोपासणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या कुटुंबियांनी रयत शिक्षण संस्थेला तब्बल ०८ कोटी ८६ लाख रुपयांची देणगी दिली. त्याबद्दल त्यांचा रयत शिक्षण संस्थेच्यावतीने संस्थेेेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज सातारा येथे कर्मवीर भूमीत समारंभपूर्वक हृद्य गौरव करण्यात आला.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पदमभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ६४ वा पुण्यतिथी सोहळा सातारा येथे अनेक मान्यवर व हजारो रयत सेवकांच्या उपस्थितीत पार पडला. थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांनी रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी सातत्याने भरीव मदत करून या संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच मोलाचा हातभार लावला आहे. रयत शिक्षण संस्था मातृसंस्था माणून सदैव रयतेच्या विकासासाठी कार्य करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावर्षीच्याही शैक्षणिक वर्षात ६ कोटी ७५ लाख रुपये, त्यांच्या पत्नी शकुंतला ठाकूर यांनी ८० लाख रुपये, ठाकूर इन्फ्राप्रोजेक्टच्या माध्यमातून चिरंजीव आमदार प्रशांत ठाकूर यांनी ८१ लाख रुपये, तर चिरंजीव परेश ठाकूर यांनी ५० लाख रुपयांची देणगी देऊन रयत शिक्षण संस्थेच्या विकासात नेहमीप्रमाणे मोलाचा वाटा उचलला आहे. त्याबद्दल या सर्व थोर देणगीदारांचा रयत शिक्षण संस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात हृद्य सत्कार करण्यात आला.
चांगले विचार स्वतः आणि इतरांना घडविण्याचे काम करते. जन्माला येताना आणि मृत्यूनंतर खाली हात जावे लागत्ते. माणुसकी आणि विचार अमर असतात, शैक्षणिकदृष्ट्या समाजाच्या विकासासाठी सर्वानी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून देणे गरजेचे आहे, या सामाजिक भावनेतून लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबिय हे कार्य करीत असतात. रयत आणि ठाकूर कुटुंबिय यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे, यासाठी कर्मवीर अण्णांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे काम रयत सेवक म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर सतत करीत आहेत. या अनुषंगाने संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यासपीठावरून बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक केले तसेच आजपर्यत संस्थेला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जवळपास १०० कोटी रुपयांची देणगी दिल्याचे जाहीर केले. त्याचबरोबरीने त्यांचे योगदान सर्वांना ऊर्जा देणारे असल्याची भावना विशद करत आदर व्यक्त केले. यावेळी सर्व उपस्थितांनी लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांचे टाळ्यांच्या गजरात आभार मानले.
या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हॉईस चेअरमन भगीरथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार दिलीप वळसे-पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार विश्वजित कदम, चेतन तुपे, आशुतोष काळे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, अरुण लाड, शशिकांत शिंदे, निलेश लंके, संस्थेचे सचिव विठ्ठल शिवणकर, माई पाटील, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमास संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, वाय. टी. देशमुख, महेंद्र घरत, अमोघ ठाकूर, अपूर्व ठाकूर, सचिन पाटील, सुरेश पाटील, सुधीर घरत, विश्वनाथ कोळी, यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने रयत सेवक उपस्थित होते.