महाड दि.९ (चंद्रकांत कोकणे) आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास महाड शहरा नजीक असलेल्या नातेखिंड भागामध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर चुकीच्या दिशेने येणाऱ्या एसटीने डंपरला जोरदार धडक दिल्याने अपघात घडला आहे.
मुंबईकडून महाडच्या दिशेने येणाऱ्या मुंबई महाबळेश्वर गाडी क्रमांक एम एच १४ बी टी ३०८२ या एसटीने नातेखिंडीजवळ आल्यानंतर उड्डाणपुलावरील डाव्या बाजूच्या दुतर्फा मार्गाचा वापर न करता चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने येऊन समोरून येणाऱ्या डंपर क्रमांक एम एच ०८ बि व्ही ५२०० ला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांच्या दर्शनीय भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातामध्ये एसटीतील एकूण २४ प्रवासी जखमी झाले असून डंपरचा चालक देखील किरकोळ जखमी झाला आहे. जखमींवर ग्रामीण रुग्णालय महाड येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. यातील नमिता गोविंद वाघमारे वय ६० राहणार तळेगाव, माणगाव व सविता सखाराम शिर्के वय ५० चींचवली माणगाव जि. रायगड या २ महिला गंभीररित्या जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी महाड येथील रानडे एक्सीडेंट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाणे मार्फत सुरू आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!