कर्जत दि.१३ (अजय गायकवाड) प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूनंतर प्रथमच ND स्टुडिओ मध्ये एका चित्रपटाचे शूटिंग केले जात आहे. स्नेहल प्रवीण तरडे दिग्दर्शित, प्राजक्ता माळी निर्मित ‘फुलवंती’या मराठी सिनेमाच्या शुटींगला ही सुरुवात करण्यात आली आहे. स्नेहल तरडे यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहिती नंतर ही माहिती समोर आली. नितीन देसाई यांनी 58 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता, त्यांच्या अकाली एक्झिटमुळे फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा पसरली होती, त्यामुळे त्यांच्या निधनानंतर शांत झालेला एनडी स्टु़डिओ आता पुन्हा एकदा या मराठी चित्रपटाच्या चित्रिकारणामुळे बहरला आहे.
२ ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली होती. तर चार ऑगस्ट रोजी एनडी स्टुडिओ परिसरात नितीन देसाई यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली होती. दरम्यान नितीन देसाई यांनी जीवाचे रान करून ND स्टुडिओ च्या माध्यमातून आपले स्वप्न साकार केले होते. परंतु तेच ND स्टुडिओ देसाई यांच्या जाण्याने शांत झाले होते. कर्जत आणि खालापूर तालुक्याच्या मध्य भागी असलेल्या या स्टीडिओ मध्ये अनेक प्रसिद्ध असे हिट चित्रपटाचे शूटिंग झाले आहेत. ND स्टुडिओला हिंदी-मराठी सिनेमा आणि मालिकांमधील भव्य आणि प्रशस्त सेटसाठी दिग्दर्शकांची कायमच पसंती राहिली आहे. परंतु नितीन देसाईंच्या जाण्याने शांत झालेल्या एनडी स्टुडीओमध्ये आता पुन्हा एकदा अॅक्शन या आवाजाचे सूर घुमू लागले आहेत. स्नेहल तरडे दिग्दर्शित, प्राजक्ता माळी निर्मिती फुलवंती या मराठी सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नितीन देसाई यांच्या जाण्यानंतर फुलवंती हा पहिला सिनेमा त्यांच्या स्टुडिओमध्ये चित्रित होत आहे.
या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्नेहल प्रवीण तरडे यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की फुलवंतीच्या निमित्ताने ND स्टुडिओ बहरला आहे. तर तरडे यांनी नितीन देसाई यांच्या आठवणींना उजाळा देत म्हणाल्या की दिग्दर्शिका म्हणून माझ्या पदार्पणाचं काम मी एनडी स्टुडीओमध्ये सुरु केलं आहे. नितीन देसाईंच्या जाण्यापूर्वी एक आठवडा आधी त्यांची आणि माझी भेट झाली होती. खरंतर आमची तशी ओळख नव्हती. पण प्रवीण आणि नितीन यांनी पूर्वी एकत्र काम केलं होतं. त्यामुळे प्रवीण मला एनडी स्टुडिओमध्ये घेऊन आला आणि माझी देसाई यांची ओळख झाली. हा माझा पहिलाच सिनेमा असल्याचं देसाई यांना सांगितलं होतं. तेव्हा अगदी आनंदात त्यांनी मला विश्वासानं म्हटलं की, काय हवं नको ते बिनधास्त सांगा आमची पूर्ण टीम तुमच्यासाठी, तुमच्या मराठी सिनेमासाठी हजर आहे. ही मराठी कलाकृती असल्यामुळे जेव्हा बजेटचा मुद्दा आला तेव्हा चर्चा झाल्यानंतर त्यांनी हवी ती मदत करण्याचं आश्वासन दिलं. पण दुर्दैवाने आमची ती भेट पहिली आणि शेवटची ठरली. स्टुडिओ हे नितीन देसाईंचे स्वप्न आहे. फुलवंती या चित्रपटाच्या निमित्ताने ते पुन्हा बहरतंय, याचा जास्त आनंद वाटतोय अशी भावना तरडे यांनी यावेळी व्यक्त केली.