अलिबाग दि.५: राज्यातील स्स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानात रायगड जिल्ह्याने उत्तम कामगिरी केली आहे. याबद्दल कोकण विभागात उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीला राज्य सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्यातर्फे आज गौरविण्यात आले.
पृथ्वी, जल, अग्नी, वायू व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये व ग्रामपंचायतीमध्ये राबविणेत येत आहे. या अभियानात रायगड जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील ५३० ग्रामपंचायतींनी या अभियानात नोंदणी करून सहभाग नोंदविला होता. या अभियानांतर्गंत पंचतत्त्वाशी संबंधित घटकांवर काम केले जाईल. त्यामध्ये पृथ्वी घटकासाठी वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी, जमिनीचे धुपीकरण थांबवणे, या मुद्द्याशी संबंधित कामे केली जात आहेत. तर वायूतत्त्वासाठी प्रदुषण कमी करणे, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जल तत्त्वाशी संबंधित कामांमध्ये नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनाऱ्याची स्वच्छता करणे, अग्नी तत्त्वानुसार उर्जेचा परिणामकारक वापर करणे, उर्जा बचत, अपव्यय टाळणे, अपारंपरिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतील. आकाश तत्त्वातील स्थळ व प्रकाशाने मानवी स्वभावात होणाऱ्या बदलांसाठी जनजागृती करणे, यावर भर दिला जात आहे.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा सन्मान सोहळा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टाटा थिएटर, एन.सी.पी.ए., नरीमन पाईट येथे पार पडला. यावेळी कोकण विभागात उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!