कल्याण दि.12: कल्याण परिमंडलात वीज चोरांविरुद्धची धडक मोहीम आणखी तीव्र होत आहे. गुरुवारी 11 नोव्हंबर रोजी डोंबिवली आणि डहाणू येथे स्वतंत्रपणे आखलेल्या मोहिमेत 63 वीजचोर आढळून आले व 37 ठिकाणचा अनधिकृत वीजवापर उघडकीस आला. संबंधितांना चोरी किंवा अनधिकृतपणे वापरलेल्या विजेचे देयक भरण्याबाबत नोटीसा बजावण्यात येत असून भरणा टाळणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी पोलिसात फिर्याद देण्यात येणार आहे.
डोंबिवलीतील नवापाडा, रेतीबंदर, देवी चौक, गरीबाचा पाडा, देवीचा पाडा, मोठा गाव परिसरात 399 वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात 19 ठिकाणी वीजचोरी तर 6 ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर आढळून आला. तर पालघर जिल्ह्यातील डहाणू उपविभागात 807 वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात 44 ठिकाणी वीजचोरी तर 31 ठिकाणी अनधिकृत वीजवापर उघडकीस आला. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक अभियंते दीपक पाटील, किरण नागावकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंते धनराज बिक्कड, प्रताप माचिये यांच्या पथकांनी ही कारवाई केली.
ऑक्टोबर महिन्यात विशेष पथकाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोहिमेत कल्याण परिमंडलात 400 पेक्षा अधिक वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. यातील जवळपास 150 जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय गेल्या महिन्यात पकडलेल्या विक्रमगड परिसरातील १३ जणांविरुद्ध गुरुवारी विक्रमगड पोलीस ठाण्यात वीज कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वीजचोरांनी 5 लाख 44 हजार 510 रुपयांची 31 हजार 220 युनिट विजेची चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दिलीप भानुशाली, सूचित मेढा, जयप्रकाश आळशी, मिलिंद आळशी, रमेश भानुशाली, समीर भानुशाली, अंकिता खेडेकर, रमेश कुमारन, आशिष शर्मा, सत्येन्द्र सिंग, श्रीधर पडवले, सुधीर पाटील, विजय आळशी अशी त्यांची नावे आहेत. तर कल्याण पश्चिमेतील चिकनघर परिसरात अब्दुल गनीचंद मणियार (अन्सारी चौक) याने 6 हजार 770 रुपयांची वीजचोरी केल्याचा गुन्हा महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात 10 नोव्हेंबरला दाखल झाला आहे.