पनवेल दि.१६: विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, वक्तृत्वकौशल्य वाढवणे आणि सार्वजनिक व्यासपीठावर मोकळेपणाने बोलण्याची सवय लावणे या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धेची वर्ग अंतर्गत फेरी पनवेल महानगरपालिका शाळा क्रमांक ०१ , ०२ आणि ०४ मध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. कोशिश फाऊंडेशन आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या वक्तृत्व स्पर्धेला विविध शाळेतील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
या शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी माझं कुटुंब, माझं स्वप्न, शिक्षणाचं महत्त्व, प्लास्टिक मुक्त भारत, स्वच्छ भारत, इंटरनेट वरदान की शाप अशा समकालीन व विचारांना चालना देणाऱ्या विषयांवर प्रभावी भाषणं दिली. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि उत्साहाने आपले विचार सादर केले. या उपक्रमामुळे मुलांमध्ये सार्वजनिक बोलण्याची भीती कमी झाली असून भाषणकलेचा पाया मजबूत झाला आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका शाळांतील मुलांना व्यासपीठ, व्यक्तिमत्व विकासाची संधी मिळाली आहे.
या फेरीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी कोशिश फाउंडेशन व महानगरपालिकेचे विशेष आभार मानले. पुढील टप्प्यात शाळा अंतर्गत आणि अंतर शालेय फेरी आयोजित करण्यात येणार असून या शाळांतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढील फेरीसाठी तयारी सुरू केली आहे.
![]()
