ठेकेदाराला १५ दिवसाचा अल्टीमेटम – प्रधान सचिव पराग जैन यांनी दिले निर्देश
पनवेल दि.६: पनवेल बसस्थानक पुनर्विकासाच्या कामासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक झाल्याने येत्या १५ दिवसात बसस्थानकाच्या कामाला सुरुवात न झाल्यास ठेका रद्द करण्याचे निर्देश परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी इडयुस पार्क इंटरनॅशनल कंपनीला दिले आहेत.
आज परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्य अभियंता गोसावी, यांच्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर यांची बैठक मंत्रालयात (मुंबई) परिवहन विभागाचे प्रधान सचिव यांच्या दालनात झाली. या बैठकीस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे वास्तुविशारद निलेश लाहिवाल, परिवहन विभागाच्या कक्ष अधिकारी श्रीमती मेंडे, ठेकेदार इडयुस पार्क इंटरनॅशनल कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुंबईचे प्रवेशद्वार व मुंबई ठाण्याहून राज्याच्या इतर भागाकडे जाणाऱ्या बसेसचे प्रमुख गंतव्य स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनवेल बस स्थानकाचे बांधा, वापरा, हस्तांतर करा या तत्वावर पुनर्विकासाचे कामास २०१६ साली मान्यता देण्यात आली होती, त्यानंतर सन २०१८ मध्ये सदर बस स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती परंतू जवळपास सहा वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनसुद्धा बस स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामास कोणत्याही प्रकारची सुरूवात झाली नाही. पुनर्विकासाच्या नावाखाली जुने बस स्थानक पाडून तात्पुरते शेड उभारण्यात आले आहे. सद्यस्थितीत तात्पुरत्या शेडमध्ये अनेक गैर सुविधा असूनही नविन बस स्थानकाच्या प्रतिक्षेने प्रवासी हा त्रास गेले सहा वर्ष सहन करीत आहेत. बस स्थानकाच्या पुनर्विकासाचे कामाला तातडीने सुरूवात करून पूर्णत्वास नेण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी निरनिराळे आंदोलन तसेच बैठका आणि विधिमंडळातही गेली अनेक वर्षे पाठपुरावा करीत आहेत. संबंधित विभागामार्फत अद्यापपर्यंत पुढील कार्यवाही न झाल्याने अखेर आमदार प्रशांत ठाकूर यांनी परिवहन विभागाला रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलनाचा निर्वाणीचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने हि बैठक पार पडली.
यावेळी बैठकीत, पनवेल बस स्थानकात प्रवाशी वर्गाला होणाऱ्या त्रासाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी आक्रमक भूमिका मांडत २०१८ साली इडयुस पार्क इंटरनॅशनल कंपनीला स्वीकृती पत्र देण्यात आले असतानाही अद्यापही काम सुरु झाले नसल्याने सदरचा ठेका रद्द करून ताबडतोब नवीन ठेकेदाराची नियुक्ती करून बस स्थानकाच्या विकासाच्या कामाला सुरुवात करण्याची आग्रही मागणी केली. नव्या बांधकाम नियमावलीमुळे (यूडीसीपीआर) अतिरिक्त बांधकाम करावे लागत असल्याने आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार ठेकेदाराने केली. मात्र या संदर्भामध्ये नियमांचे पालन करूनच काम करावे, लागेल असे निर्देश ठेकेदाराला पराग जैन यांनी दिले. त्या अनुषंगाने प्रधान सचिव पराग जैन यांनी तातडीने कार्यवाही होण्यासाठी येत्या १५ दिवसाचा अल्टीमेटम संबंधित ठेकेदार इडयुस पार्क इंटरनॅशनल कंपनीला दिले आहे.
या एसटी स्थानकाचा वापर सर्वसामान्य गोरगरीब माणूस दैनंदिन कामासाठी करीत असून त्याला अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. तरी या संदर्भामध्ये ठेकेदाराला यापुढे एकही दिवसाची मुदत देऊ नये अशी मागणी यावेळी केली. सदर मागणी प्रधान सचिव पराग जैन यांनी मान्य केली असून सदर कामासंदर्भात पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनाही या कंत्राटाचे आराखडे मंजूर करण्यासंदर्भामध्ये सूचना केल्या असल्याचे नमूद केले. त्यामुळे या महत्वपूर्ण बैठकीमुळे आता बस स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, अशा अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!