पनवेल दि.23: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना (कोविड १९) चे रुग्ण वाढत आहेत, हि मोठी चिंतेची बाब लक्षात घेता प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करावी, अशी मागणी वजा सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची आयुक्तांसमवेत त्यांच्या दालनात बैठक झाली. या शिष्टमंडळात महापौर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अमर पाटील, संतोष भोईर, मुकीद काझी, नगरसेविका रुचिता लोंढे आदींचा समावेश होता.
यावेळी झालेल्या बैठकीत, कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येबाबत काय उपाययोजना करायला हवी यावर चर्चा झाली आणि यावर प्रशासनाने गांभिर्याने लक्ष द्यावे, व त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर यावेळी महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागात तसेच मुस्लिम समाजात कोरोना बद्दल जागृती, ग्रामपंचायती मधून महापालिकेत वर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यावी, महापालिकेत पुरेसे नसलेले मनुष्य बळ अशा विविध विषयांवर चर्चा झाली. या विषयायांवर योग्य ती कार्यवाही व्हावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली.