कळंबोली दि.११ : कळंबोलीत मायाक्का देवीचा उत्सव मोठ्या जल्लोषात अन भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. उत्सव निमित्त कळंबोली वसाहती मधून मायाक्का देवीच्या प्रतिमेची मिरवणूक वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात ,भंडारा उधळीत अन् फटाक्यांच्या आतषबाजित काढण्यात आली. या उत्सवामध्ये कळंबोली वसाहती मधील धनगर समाज बांधव व मायाक्का देवीचे भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कळंबोली मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने गेल्या अनेक वर्षापासून राहात आहेत. या समाज बांधवांचे हृदय स्थानी असणाऱ्या मायाक्का देवीच्या उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात कळंबोली वसाहतीमध्ये साजरा केला जातो. वसाहतीमध्ये मायाक्का देवीचे मंदिर ही आहे .या मंदिरापासून मायाक्का देवीच्या प्रतिमेचि मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात, भंडारा उधळीत अन् येळकोट येळकोट जय मल्हार चा जय घोष करीत पालखीतून काढण्यात आली. यामध्ये समाज बंधू ,महिला, बच्चे कंपनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .या मिरवणुकीत महिला भगिनींनी फुगड्याचा फेर ही धरला. मायाक्का देवीच्या उत्सवानिमित्त धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने मायाक्का देवीच्या मंदिरात एकत्रित जमा झाले होते. यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. मायाक्का देवीच्या पालखी सोहळा वाजत गाजत गजी नृत्याचा आविष्कार करीत भंडारा उधळीत कळंबोली वसाहती मधून फिरवण्यात आली. यावेळी पालखी सप्तशृंगी मंदिर जवळ येतात धनगर समाज बांधवांनी भंडाऱ्याची उधळण करत देवीच्या देवळात मिरवणूक घेऊन मानही देण्यात आला. या पालखी सोहळ्यात तरुण-तरुणी पुरुष महिला वर्ग पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते. त्यामुळे पालखी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.