ठाणे दि.१६: आपले जीवन सुखी, आनंदी व समृद्ध करायचे असेल तर जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायला हवा. 26 डिसेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. त्याची वैज्ञानिक माहिती प्रत्येकाने करून घ्यावयास हवी व ग्रहणासंबंधी मनातील गैरसमज दूर करायला हवेत “असे खगोल अभ्यासक, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष दा.कृ.सोमण यानी सांगितले. शुभकुदा प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग यांच्या सहयोगाने ब्रह्माड परिसरात एका वटवृक्षाखाली शनिवारी ‘विज्ञान कट्टा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आरोग्य, निसर्ग इत्यादी विषयांवर विज्ञान विषयक गप्पांचा कार्यक्रम होईल. तज्ज्ञ श्रोत्यांच्या प्रश्नाना उत्तरे देतील. साधना वझे यांनी मराठी विज्ञान परिषद करीत असलेल्या कार्याची ओळख करून दिली. 26 डिसेंबरच्या सूर्यग्रहणासंबंधी संपूर्ण माहिती दा.कृ.सोमण यांनी आपल्या भाषणात करून दिली. तसेच ग्रहणविषयक गैरसमजूती वैज्ञानिक माहिती देऊन दूर केल्या. मराठी विज्ञान परिषदेने प्रत्येक सूर्यग्रहणाच्यावेळी केलेल्या प्रयोगांची माहिती त्यानी मनोरंजक भाषेत करून दिली.श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांचीही त्यानी समर्पक उत्तरे दिली. या विज्ञान कट्टा कार्यक्रमास श्रोत्यांनी गर्दी केली होती.