मुंबई दि.२२: या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण येत्या गुरुवारी दि. २६ डिसेंबर रोजी होणार असून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यातील काही भागातून दिसणार असून उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण कंकणाकृती स्थितीत दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. या विषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की नऊ वर्षांपूर्वी १५ जानेवारी २०१० रोजी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती भारतातून दिसली होती. खग्रास सूर्यग्रहणाच्यावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. त्यामुळे जरी चंद्रबिंब सूर्यबिंबाच्या आड आले तरी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसतच राहते. याला ‘फायर रिंग‘असेही म्हणतात. अशावेळी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते.
यावेळी गुरुवार २६ डिसेंबर रोजी अशी कंकणाकृती अवस्था दक्षिण भारतातील कोइम्बतूर,धरपूरम, दिंडीगुल, एरोडे, कान्हनगड ,कन्नूर, करूर, कोझीकोडे, मदेकेरी, मंगलोर, मंजेरी, उटी,फाल्लकड, पायन्नूर,पोलची,पुडुकोटल,तिरूचीपल्ली,तिरूर इत्यादी ठिकाणांहून सकाळी सुमारे दोन ते तीन मिनिटे दिसणार आहे. त्यामुळे भारतातील व परदेशातील अनेक खगोलप्रेमी याभागातून ग्रहण निरिक्षण करण्यासाठी गेले आहेत. खग्रास सूर्यग्रहणात छायाप्रकाश लहरी, डायमंड रिंग, करोना, दिवसा काळोख झाल्यामुळे होणारे ग्रह-तारका दर्शन जसे होते तसे अविष्कार कंकणाकृती सूर्य ग्रहणात दिसत नाहीत. फायर रिंगचे अद्भूत दर्शन मात्र होते.
महाराष्ट्रातून ग्रहणदर्शन:
महाराष्ट्रातून सुमारे ८० ते ८४ टक्के सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकले गेलेले दिसणार आहे. गुरुवार, २६ डिसेंबर रोजी मुंबईतून सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ झालेला दिसेल. ग्रहणमध्य सकाळी ९ वाजून २२ मिनिटांनी होईल. त्यावेळी जास्तीत जास्त सूर्यबिंब चंद्रबिंबामुळे झाकलेले दिसेल. सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. चंद्रग्रहण जिथून दिसते त्यावेळी सर्व ठिकाणांहून एकाचवेळी ते दिसत असते. सूर्यग्रहणाचे तसे नसते. ते दिसण्याच्या वेळा स्थानपरत्वे थोड्याप्रमाणात बदलत असतात.
घ्यावयाची काळजी:
सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहू नये. पाहिल्यास दृष्टीस इजा होते. सूर्यग्रहण ग्रहणचष्म्यातूनच पहावे. किंवा थेट सूर्याकडे न पाहता गोलाकार छिद्र असलेल्या चाळणीतून सफेद कागदावर सूर्याची प्रतिमा घेऊन त्यामध्ये ग्रहणाचे निरिक्षण करावे. दुर्बिण किंवा द्विनेत्रीतून पाहताना योग्य फिल्टरचा वापर करावा.
ग्रहणालिषयी गैरसमज:
आपल्याकडे ग्रहणाविषयी अनेक गैरसमज आहेत. ग्रहण पाहू नये, ग्रहणात जेवू नये, ग्रहणकालात झोपू नये, ग्रहणकालात झोपू नये असे समजले जाते त्यात काहीही तथ्य नसल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले. ग्रहणे हा नैसर्गिक अविष्कार आहे. सावल्यांचा खेळ आहे. ग्रहणे निरीक्षण करून त्यामागचे विज्ञान समजून घेतले पाहिजे. कोणत्या राशीला हे सूर्यग्रहण शुभ आहे ? असा प्रश्न विचारताच दा. कृ. सोमण म्हणाले की जे लोक हे सूर्यग्रहण काळजीपूर्वक निरीक्षण करतील त्यांच्या राशीला हे सूर्यग्रहण शुभ आहे कारण आलेल्या निसर्ग अविष्काराचे निरीक्षण करून ते त्यामागचे विज्ञान समजून घेत आहेत.
यानंतर पुढच्यावर्षील २१ जून २०२० रोजी होणार्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती पंजाब, राजस्थान, हरियाणा व उत्तराखंड या राज्यातील प्रदेशातून दिसणार आहे. उर्वरित भारतातून त्यावेळीही खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार अस्ल्याचे सोमण यांनी सांगितले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!