मुंबई दि. १८: कोकणामधील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणे, तेथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी करणे व त्या जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय यंत्रणांना मदत करण्याच्या दृष्टीने विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील भाजपचे आमदार उद्या मंगळवार १९ मे पासून रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयाचा दौरा करणार आहेत. माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे आमदार भाई गिरकर, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, आमदार नितेश राणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रमेश पाटील व आमदार महेश बालदी या दौ-यामध्ये सहभागी होणार आहेत.
कोकणच्या दौ-याची सुरुवात रायगड जिल्यापासून होणार आहे. पनवेल येथील एमजीएम रुग्णालय येथून या दौ-याला सुरुवात होणार आहे. सकाळी ९.३० वाजता एमजीएम रुग्णालयाला भेट देण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता जिल्हयाचे जिल्हाधिकारी व अन्य शासकीय अधिका-यांशी चर्चा करण्यात येईल. तेथून ११.४५ च्या सुमारास कोण येथील गावी सुरु करण्यात आलेल्या क्वारांटाईन सेंटर ला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर दुपारी १.१५ च्या सुमारास पेण येथील गणेश मूर्तिकारांची भेट घेण्यात येईल. कोरोनामुळे निर्माण झालेल्या त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात येईल. याप्रसंगी आमदार रविशेठ पाटील उपस्थित राहणार आहेत. तेथून महाड येथील प्रांताधिका-यांशी कोरोनोच्या परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यात येईल.
रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीची सर्व अधिका-यांशी चर्चा करुन सविस्तर आढावा घेण्यात येईल. तसेच या तीनही जिल्ह्यांमधील तेथील जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व सध्या सुरु असलेल्या आरोग्य व्यवस्थेची पाहणी करण्यात येईल, त्याचप्रमाणे कोरोनाची गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हास्तारावरील स्थानिक प्रशासनाला अधिक मदतीची आवश्यकता असल्यास आमदार निधीतून मदत उपलब्ध करुन देण्याची तयारी आहे. संबंधित जिल्ह्यात त्या-त्या ठिकाणी आवश्यक मदत आमदार निधीमार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल.
कोरोनाच्या सध्याची परिस्थितीत अधिक चांगल्या पध्दतीने नियंत्रणात आणण्यासाठी व आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने भाजपच्या वतीने संबंधित जिल्हाधिका-यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात येणार आहे.