पनवेल, दि.31: पनवेल रेल्वे स्टेशनच्या परिसरातून 3 महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणार्या आरोपीला 24 तासात पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेवून त्या बाळास नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.
पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेरुन 3 महिन्यांच्या बाळाचे अपहरण झाल्याचे पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपहृत बाळ व आरोपीचा शोध घेण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याकडुन 5 पथके तयार करण्यात आली. सदर पथकाने पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता एक महिला ही यातील अपहृत बाळासह पुण्याच्या दिशेने जाणार्या रेल्वेमध्ये बसताना दिसुन आली. त्यावरुन सदर आरोपी व अपहृत बाळाचा शोध घेणेकामी कर्जत, लोणावळा, दौंड, पुणे येथे पथके रवाना केली. सदर पथकांनी केलेल्या तपासामध्ये यातील आरोपी ही पोलीसांना गुंगारा देण्यासाठी लोणावळा येथुन रेल्वेने पुन्हा पनवेलच्या दिशेने आल्याचे दिसुन आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या आजुबाजुच्या पोलीस ठाण्यास गुन्हयाच्या घटनेबाबत माहिती देऊन यातील अपहृत बाळ व आरोपीचा शोध घेणेबाबत कळवण्यात आले होते. गुन्हयाच्या तपासादरम्यान कळंबोली पोलीस ठाण्याचे वपोनि राजेंद्र कोते यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यास कळवले की, त्यांच्या पोलीस ठाण्याच्या नेमणुकीस असलेल्या सपोनि तृप्ती शेळके या कळंबोली सर्कल कडुन कळंबोली पोलीस ठाण्याकडे येते असताना त्यांना यातील आरोपी ही अपहृत बाळासह कळंबोली फायर ब्रिगेड जवळ दिसुन आल्याने त्यांनी आरोपीस ताब्यात घेऊन अपरहत बाळाची सुटका केली असल्याचे कळवले. त्यानंतर अपहृत बाळास सुखरुप तिच्या आईच्या ताब्यात दिलेले आहे. यातील आरोपी रोशनी विनोद वागेश्री वय 35 वर्षे, रा. पनवेल रेल्वे स्टेशन समोरील झोपडपट्टी पनवेल, ही पनवेल शहर पोलीसांच्या ताब्यात असुन गुन्ह्याचा पुढील तपास चालु आहे. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त नवी मुंबई; संजय ऐनपुरे, पोलीस सह आयुक्त नवी मुंबई; प्रशांत मोहीते पोलीस उपायुक्त परि 02, पनवेल, नवी मुंबई; अशोक राजपुत, सहा. पोलीस आयुक्त पनवेल विभाग, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे, पोनि (गुन्हे) शाकीर पटेल, पोनि (प्रशा) अभिजीत अभंग, सपोनि प्रकाश पवार, सपोनि तृप्ती शेळके (नेम- कळंबोली पोलीस ठाणे), पोउपनि विनोद लभडे, पोउपनि अंकुर शेलार, पोउपनि उद्धव सोळंके, पोहवा महेंद्र वायकर, पोहवा अमोल डोईफोडे, पोहवा गंथडे, पोहवा अमोल पाटील, पोहवा बोरसे, पोहवा महेश पाटील, पोशि किरण कराड, पोशि विशाल दुधे, पोशि नितीन कांबळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.
![]()
