कळंबोली दि.३: कळंबोली वसाहतीमध्ये ठिकठिकाणी हातगाड्यांवर व्यवसाय करण्याचे पेव फुटले आहे. विविध ठिकाणी हॉकर्स झोन निर्माण करूनही हातगाड्यांचे जाळे काही थांबायला मागत नाही. या हातगाड्यांच्या मागे कोणाचा हात आहे हे शोधणे आता महापालिकेने सुरू केले आहे. कळंबोलीचे प्रभाग अधिकारी अरविंद पाटील यांनी सोमवारी ११ हातगाड्या ताब्यात घेऊन बुलडोजरच्या साह्याने त्या नामशेष करण्यात आल्या. दैनंदिन काही ठराविक पैसे घेऊन हातगाड्या मागे वरदस्त ठेवणाऱ्या हातगाड्या माफीयांचे धाबे महापालिकेच्या या धाडसी कारवाईमुळे चांगलेच दणाणले आहेत .प्रभाग अधिकाऱ्यांनी उचललेल्या कठोर कारवाई चे कळंबोली मधून समर्थन होत असून कळंबोली हातगाडी मुक्त होणार असल्याचा निर्धार कळंबोली प्रभाग अधिकारी अरविंद पाटील यांनी व्यक्त केला आहे.
कळंबोली वसाहतीला जसा अनधिकृत पार्किंगचा विळखा बसला आहे त्याच प्रकारे अनधिकृत हातगाड्या चालकांचाही अजगरासारखा विळखा हा वसाहतिला पडला आहे. ठिकठिकाणी हातगाड्यांचे पेव फुटले आहेत .या हातगाड्यांमुळे वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. वसाहतीमधील जुनी सुधागड ते सिंग हॉस्पिटल पर्यंतच्या रस्त्यामध्ये ठिकठिकाणी हातगाड्यांवर विविध फळे व अन्य साहित्यांची विक्री राजरोस केली जाते .या हातगडांमुळे वाहतूक लाही मोठा अडथळा निर्माण होतो. हातगाड्यांवाल्याची दादागिरी ही खूप मोठी वाढलेली आहे .या हातगाडीवर व्यवसाय करणारे हे बहुतांशी मानखुर्द गोवंडी येथून दररोज ते येत असतात .काही ठराविक रक्कम येथील हातगाडी माफीयांना ते देतात. त्यांच्याकडे काही व्हिजिटिंग कार्डही देऊन ठेवण्यात आली आहेत .कुठलाही अधिकारी आला की त्याला ती व्हिजिटिंग कार्ड दाखवायची म्हणजे कारवाई केली जात नाही अशा शिरस्ता कळंबोली वसाहतीमध्ये सुरू आहे .परंतु या हातगाडी माफीयांना सुरुंग लावण्याचे काम कळंबोलीतील महापालिकेचे प्रभाग अधिकारी अरविंद पाटील यांनी लावल्याने हातगाडी माफियांचे चांगले धाबे दणाणले आहेत. सोमवारी सकाळपासून हातगाडी वर कारवाई करण्याचे सत्र सुरू केल्याने त्याचे संदेश अख्या वसाहतीमध्ये इतरत्र गेल्याने काही काळातच गल्ली बोळामध्ये हातगाड्या शिरून वसाहत पूर्णपणे हातगाडी मुक्त झाल्याचे दिसले. परंतु या हातगड्यांच्या मागे असणाऱ्या हातापर्यंत महापालिका पोहोचेल काय असा यक्ष प्रश्न विचारला जात आहे .नुसत्या तुरळक हातगाड्यांवर कारवाई करण्य बरोबरच राजरोस व्यावसायिक सिलेंडर लावून जे व्यवसाय केले जातात त्या बेकायदा हातगाड्यांवर कारवाई केली जाणार का असाही सवाल केला जात आहे. महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचा धसका आज हातगाड्या व्यवसायिकांनी घेतला आहे. सेंट जोसेफ हायस्कूल जवळ असलेल्या हातगाड्या गायब झालेल्या दिसल्या. रस्ता पूर्ण मोकळा झालेला दिसला. त्याचे श्रेय निश्चितच प्रभाग अधिकाऱ्यांना दिले जात आहे. महापालिकेचे प्रभाग अधिकारी अरविंद पाटील यांनी उचललेल्या धाडसी कारवाई चे कळंबोली वसाहती मधून स्वागत करण्यात येत असून संपूर्ण वसाहत हातगाडी मुक्त करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.