पनवेल दि.8 (जयंत टिळक) : स्पर्श, गंध, रंग, रुप, चव या ५ मानवी संवेदनांमधली रंग ही एक  महत्त्वाची संवेदना आहे. मानवी जीवनात रंगांचे स्थान अनन्यसाधारण  आहे. निसर्गात रंगच नसते तर आपलं आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांसारखं एकसुरी, उदासवाणं झालं असतं. अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांना मी अजिबात वाईट म्हणणार नाही. अनेक कृष्णधवल चित्रपट अगदी ‘क्लासी’ होते. पण यातलाच एक क्लासी ‘मुगल-ए-आझम’ काही वर्षांपूर्वी जेव्हा सप्तरंगात न्हाऊन निघाला तेव्हा तो अधिक खुलला हेही वास्तवच आहे.
मूल जन्मतं तेव्हापासूनच त्याच्या जीवनात रंग येतात. जन्माला येणारं मूल काळं आहे की गोरं ही उत्सुकता (आई सोडून) सगळ्यांनाच असते. जन्माला आलेलं मूल ही मुलगी असेल आणि ती जर गोरीपान असेल तर (बर्‍याच पालकांचं) मुलगी झाल्याचं दु:ख काहीसं कमी होतं हे वास्तव आहे. इंद्रधनुष्यात सात रंग असतात हे आपण लहानपणीच शिकतो आणि
पावसाळ्यात अनुभवतोही. पण हे सात मुख्य रंग झाले. निसर्गात यातील
प्रत्येक रंगाच्या अक्षरश: हजारो छटा आहेत. थॅक्स टू अवर आइज…  आपले मौल्यवान डोळे या सगळ्या रंगछटा अनुभवू शकतात, त्या डिफरन्शिएट करु शकतात, त्यांचे विश्लेषण करु शकतात.
सतराव्या शतकात रंगीत छपाई सुरु झाली तरी तिला खूप मर्यादा होत्या. 1970 च्या अखेरीस इलेक्ट्रॉनिक कलर सेपरेशनचे तंत्र माणसाच्या हाती गवसले आणि मुद्रण क्षेत्रात मोठीच क्रांती झाली. यलो, रेड  (मॅजेंटा) आणि ब्लू (सायन) आणि फिनिशिंग कलर म्हणून ब्लॅक या चार रंगांच्या संयोगातून अनेकरंगी छपाई होऊ लागली. आता मासिकेच नाही तर जवळजवळ सगळीच वर्तमानपत्रेही रंगीत झाली आहेत.
घराला रंग देण्याच्या (पेंटींग कलर्सच्या) अशाच असंख्य शेडस आहेत. (त्यातही बाहेरुन आणि आतून असे दोन ढोबळ प्रकार आहेत). तर छपाईच्या (प्रिंटिंगच्या) आणखी वेगळ्या. छपाईतही पेपरवर करण्याच्या
छपाईच्या वेगळ्या, प्लॅस्टीक वा कापडावर करण्याच्या छपाईच्या वेगळ्या, धातूंवर करावयाच्या छपाईच्या वेगळ्या. चित्रकलेत वॉटर कलर्स वेगळे आहेत, पोस्टर कलर्स वेगळे आहेत, पेस्टल कलर्स वेगळे आहेत, अ‍ॅक्रिलिक कलर्स वेगळे आहेत. कापडांच्या रंगांच्याही अशाच असंख्य शेडस आहेत. मित्रांनो, या सगळ्या तांत्रिक नावांव्यतिरिक्त बर्‍याच अतांत्रिक शेडससुद्धा आहेत त्या आहेत, बायकांच्या परिभाषेतल्या.
स्त्रियांची रंगांची एक वेगळीच परिभाषा आहे असे म्हणायला हरकत  नाही. कदाचित दैनंदिन जीवनांत त्यांचा ज्या ज्या गोष्टींशी संपर्क येतो त्यांचेच संदर्भ, परिमाणे त्यांनी रंगांना बहाल केली असावी. (आजही बर्‍याच) बायकांचा वावर जास्त करुन स्वयंपाकघरात असल्यामुळे त्यांच्या रंगाच्या जगात खाद्यपदार्थ, फळे आणि भाज्यांनाही स्थान आहे. म्हणून तर डाळींबी कलर, चटणी कलर, गहू कलर, दुधी कलर, टोमॅटो कलर, बैंगणी (वांगी) कलर, अंजिरी कलर, लिंबू कलर, करवंदी कलर, बिस्कीट कलर,पिस्ता ग्रीन, मेहंदी ग्रीन हे शब्द तुम्हाला कधी ना कधी तुमच्या घरात, तुमच्या पत्नीकडून, बहिणीकडून वा आईकडून ऐकायला मिळाले असतील. स्त्रियांच्या परिभाषेतील सोनसळी कलर, अबोली कलर, शेवाळी कलर, बदामी कलर, मोतिया कलर, राणी कलर, चिंतामणी कलर, तपकिरी, विटकरी, किरमिजी, पीच, मरुन आणि अशा असंख्य कलर शेडस आहेत, ज्यांची तांत्रिक व्याख्या करता येत नाही, त्यांचे पर्सेंटेज, प्रमाण ठरविता येत नाही. मग या शेडसचं स्टँडर्डायझेशन कसं करणार ? ते करायचं नसतंच मुळी ! प्रत्येक स्त्रीच्या मनातली चटणी, गहू, लिंबू, अबोली, शेवाळी, बदामी, दुधी, टोमॅटो, वांगी इ. रंगांची ‘इन्टेन्सिटी वेगळी असते. ती त्या त्या संबधित (साडी, ड्रेस मटेरियल इ.) दुकानदारांना कळण्याशी मतलब !
मुळात पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया अधिक संवेदनशील असल्यामुळे  रंगांच्या बाबतीतही त्या विशेष संवेदनशील असाव्यात. छपाईच्या इंक्समध्ये ब्राइट यलो, डीप ब्राऊन, पॉप्युलर ग्रीन, युनिव्हर्सल रेड, रॉयल ब्लू अशा सर्व शेडस ठरलेल्या आहेत. कुठल्याही कंपनीची शाई घेतलीत तरी तिच्या शेडमध्ये फारसा फरक पडणार नाही. इथे बायकांच्या परिभाषेतला ‘चटणी कलर’ हा प्रत्येक स्त्रीनुसार (तिच्या जहाल, अतिजहाल, कमी जहाल प्रकृती-प्रवृत्तीनुसार) बदलत असणार !
लिंबू कलरचाही तोच प्रकार ! त्यात कच्चे, अर्धकच्चे, पिकलेले सुद्धा असणार ना ? पण या लिंबू कलरबद्दल मी फार ताणून धरत नाही कारण रंगांच्या अधिकृत भाषेत लेमन यलो कलर आहे!) आकाशी रंगाचेही तेच! मला सांगा, आकाशाचा रंग सगळीकडे, सगळ्या ऋतूत एकच असतो का? इथेही आकाशी – कंसात हिवाळ्यातलं आकाश किंवा डिसेंबरमधलं आकाश असं का म्हणत नाहीत ?
मोरपिशी रंग हाही एक गोंधळात टाकणारा रंग आहे. मोराच्या पिसार्‍यामध्ये अक्षरश: अनेक छटा असतात. त्यातला नेमका कोणता रंग मोरपिशी म्हणून बायकांना अभिप्रेत असतो ? पण मोरपिशी म्हटलं की दुसर्‍या स्त्रीला आणि मुख्यत: दुकानदारांना बरोब्बर कळतं. मोरपिशी रंगाशी साधर्म्य सांगणारा ‘पिकॉक ब्लू’ हा एक रंग मुद्रणाच्या परिभाषेत आहे, पण गंमत म्हणजे तो मोरपिशी रंग म्हणून स्त्रियांना मान्य नाही. किरमिजी म्हणजे नक्की कुठला ते अजून मला समजलेलं नाही.
दुधी कलर म्हटला तर आपल्या डोळ्यासमोर हलक्या हिरव्या रंगाचा दुधी भोपळा येईल, पण दुधी कलर म्हणजे दुधाचा रंग म्हणे! शेवाळी कलर म्हणतात तेव्हा नक्की कुठलं शेवाळं त्यांना डोळ्यासमोर असतं देवास ठाऊक ! कारण शेवाळं ही एक पाणवनस्पती आहे आणि तिच्या बर्‍याच जाती आहेत. प्रत्येकाची शेड वेगळी ! डबक्यातलं शेवाळं वेगळं अन् जलाशयातलं शेवाळं वेगळं ! बदामी कलर म्हटला की आपल्या डोळ्यासमोर बदामांचा ब्राऊन कलर येतो पण त्याला बदामी रंग म्हणायचं नाही. स्त्रियांच्या परिभाषेतला मोतिया कलर म्हणजे मोत्याच्या दागिन्यांचा कलर नाही ! चिंतामणी कलर म्हटलं तर (चिंतामणी हे गणपतीचे नाव समजून) आपण शेंदरी रंगाला चिंतामणी कलर म्हणू तर चूक ठरु.
चटणी कलर, गहू कलर, लिंबू कलर, टोमॅटो कलर, वांगी कलर, अंजिरी कलर, शेवाळी कलर, अबोली कलर, बदामी कलर हे एकवेळ ठीक आहेत. कारण त्यातून काही रंगबोध तरी होतो, पण राणी कलर…? हा सर्वात कन्फ्युझिंग कलर आहे! (पुरुषांना आवडती राणी व नावडती राणी, फारतर इंग्लंडची राणी माहीत असते.) तुम्ही राणी कलर म्हणता तेव्हा तुम्हाला कोणती राणी अभिप्रेत असते? किंवा जो राणी कलर मानला गेला आहे त्याला राणी कलर का म्हणायचं याचं समाधानकारक उत्तर मला मिळालं नाही. एका मित्राच्या ‘राणी’ला विचारलं तेव्हा ती म्हणाली, ‘राणी कलर म्हणजे गुलबाक्षी रंग. हा रंग बहुतेक स्त्रियांना आवडतो, कुणालाही खुलून दिसतो आणि कशावरही ‘मॅच’ होतो म्हणून तो राणी कलर!’ (पण गुलबाक्षीमध्येही अनेक रंगछटा आहेत त्याचं काय?) पिंक मध्येही बेबी पिंक आणि डार्क पिंक असे दोन प्रकार आहेत.
तुम्हा-आम्हाला जो गुलाबी कलर अभिप्रेत असतो तो बायकांना नसतो. विशेषत: एखाद्या पाकक्रियेसंबधात. तुम्ही प्रयोगादाखल एखादी रेसिपी वाचा.. त्यात एक वाक्य तुम्हाला हमखास आढळेल… अमका पदार्थ ‘गुलाबी होईपर्यंत’ कढईत भाजा/परता. बिलीव्ह मी, त्या पदार्थाला आजन्मात गुलाबी रंग येत नाही. इथे गुलाबी म्हणजे फिकट तांबूस असा अर्थ घ्यायचा असतो.
आपल्या संस्कृतीमध्येच नव्हे तर जगभरात रंगांना विशिष्ट अर्थ आहेत. जसा पांढरा रंग शांतीचा, पावित्र्याचा, लाल रंग शक्तीचा, काळा व करडा (ग्रे) दु:खाचा, शोकाचा. मात्र, रंगांचे हे अर्थ स्त्रियांच्या कितपत गावी असतात देवास ठाऊक. ‘मॅचिंग’ हा मात्र त्यांचा मुख्य निकष असतो! त्यांच्याकडे एखाद्या साडीवरचा मॅचिंग ब्लाऊज नसेल (किंवा होत नसेल) तर ती साडी तितके दिवस नेसली जात नाही.
एकूणच स्त्रियांचे रंगांवर मनस्वी प्रेम असते. ज्या रंगाच्या कपड्यांची  पुरुष कल्पनाही करु शकणार नाहीत असे रंग स्त्रियांना हमखास आवडतात. या सर्व रंगांचे ड्रेसेस, साड्या, त्यांच्यावरचे मॅचिंग ब्लाऊज, टॉप वा ओढण्या आपल्या वॉर्डरोबमध्ये असाव्यात असे त्यांचे स्वप्न असते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!