रत्नागिरी दि.22 (सुनील नलावडे) तळकोकणात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने चिपळुण खेड संगमेश्वर राजपुरमध्ये महापुर आल्याने हाहाकार उडाला असुन कोकण ठप्प झाले आहे. महामार्ग व कोकण रेल्वे सुध्दा बंद पडली असुन संगमेश्वर बावनदी पासुन चिपळूण पर्यंत पोहोचणे अवघड व धोकादायक बनले असतानाच चिपळूणला पुराच्या पाण्याचा विळखा बसला आहे. सारे  चिपळूण जलमय झाले आहे. सुमारे पाच हजार चिपळूणकरांना आपापल्या घरे, इमारतींमध्ये अडकून पडावे लागले असुन या सर्वानी मदतीसाठी टाहो फोडला आहे. मात्र त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी सायंकाळ होई पर्यंत कोणतीही यंत्रणा प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने सारे गलितगात्र स्थीती प्रतिक्षा करत होते.

     चिपळूणमध्ये पुराची भीषण परिस्थीती ओढवली असुन संपुर्ण चिपळुण शहर खेर्डी, कळंबस्ते, परिसर पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे ही परिस्थीती निर्माण झाली असुन वाशीष्टी व शीवनदीला आलेल्या पुरामुळे चिपळुण जलमय झाले आहे. अंतर्गत रस्ते तब्बल आठ फुटपाणी भरलेले असल्याने बंद झालेले आहेत. बाजारापेठा व शेकडो घरांमध्ये पाणी शीरले आहे.

     मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतुक सुध्दा ठप्प झाली आहे. हम रस्त्यावरील बहाद्दुर शेख पुल वहातुकीसाठी बंद झाला आहे. अनेक घरांच्या छप्परां पर्यंत पाणी आल्याने शेकडो घरांची परस्थीती बिकट बनली आहे. लोक जिवाच्या भीतीने आकांत करत असुन उशीरा पर्यंत त्यांच्या पर्यंत पोहोचलेली नाही. शहरातील जुना बाजारपुल, बाजारपेठ, जुने बसस्टॅड, चिंचनाका, मार्कंडी, बेंदरकर आळी, मुरादपुर रोड,एसटी स्टँड, भोगाळे व परशुराम नगर जलमय झाला असुन घरे पाण्याच्या विळघ्यात कोंडली आहेत. साप व मगरींच्या संचारामुळे व काही घरांमध्ये घुसल्याने हाहाकार उडाला.

     अतिवृष्टी, हायटाईड आणी कोयनेचे पाणी सोडल्यामुळे वाशीष्टी नदीला पुर आला असे आता चिपळूणकरांचे म्हणणे आहे. वाशीष्टी नदीवरील रेल्वेच्या पुलाला पाणी लागले होते. पुराचा धोका लक्षात येताच कोकण रेल्वे प्रशासनाने रेल्वे थांबवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे विविध स्थानकांवर रेल्वे थांबवुन ठेवण्यात आल्या आहेत.

     बचाव कार्यांसाठी चिपळुण नगरपालीकेच्या दोन बोटी तैनात झाल्या असुन रत्नागिरीमधुन पोलिस व कोस्ट गार्डकडच्या दोन बोटी पोहचत आहेत. पुण्याहून एनडीआरफच्या दोनटिम चिपळुण व खेडसाठी मागवण्यात आल्या आहेत.

     चिपळुण शहरात पावसामुळे दोन बळी गेल्याची प्राथमिक माहिती आहे. एक महिला पाण्यात बुडाली असुन दुसरी वाहून गेली असे सांगण्यात येते. एकविरा मंदिर भागात राहणाऱ्या एका कुटुंबाला पुराच्या पाण्यातुन बाहेर काढताना वृध्द महिला बुडून मृत्यु झाल्याचे सांगण्यात येते.

  संगमेश्वर बाजारपेठेत, आठवडा बाजार, राम पेठ रोड, गणपती मंदिराजवळ, गदे वखार, भीडे वखार आदी भागात शास्त्री नदीमुळे पुरस्थीती निर्माण झाली असुन नदीकाठच्या घरातुन नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असुन व्यापारी दक्ष असल्याने बचावले आहेत. गेले दोन दिवस संगमेश्वर पट्टयात मुसळधार पाऊस कोसळत असुन फुणगुस खाडी पट्टा जलमय आहे. अंतर्गत रस्ते बंद पडले आहेत. फुणगुस संगमेश्वर रस्ता बंद झाला आहे.

     मुसळधार पावसामुळे बावनदीला पुर आला असुन पुराचे पाणी पुलाला टेकल्यामुळे आज सकाळी सात वाजल्यापासुन वाहतुक बंद करण्यात आली. देवरूख रत्नागिरी मार्गही बंद पडला. बावनदीला आलेल्या पुरामुळे निवधेतील फुट ब्रीज वाहुन गेला त्यामुळे गावांचा संपर्क तुटला, कासार कोळवण मधील साकव वाहुन गेला त्यामुळे देवरूख मार्लेश्वर मार्ग बंद झाला आहे. महामार्गावर आंबेड खुर्द कुरधुंडा आदी ठिकाणी पुराचे पाणी आहे. कोल्हापुर रत्नागिरी मार्गावरील घोळसवडे, लव्हाळा, निळे,येलुर या ठिकाणी पाणी पहाटे पासुन भरल्याने रत्नागिरी – कोल्हापुर महामार्ग बंद पडला आहे.

     लांज्यामध्ये भांबेड येथे पुराचे पाणी भरुन भातशेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे खेड-दापोली, खेड-भैरवली मार्ग बंद झालेला आहे. लांजा – काजरघाटी रस्ता पुरामुळे वाहतुकी करता बंद झाला आहे. विलवडे वाखेडपुल वाहतुक बंद, चिपळुण एसटी आगारात पाणी भरले असुन काही जण एसटी टपावर बसले होते. बावनदी, अंजणारी, चांदेराई पुलावरुन पाणी जात असल्याने वाहतुक ठप्प झाली आहे. रत्नागिरी जवळील टेंबे बौध्द वाडी येथे निघालेली आशा प्रदिप पवार या महिलेचा पऱ्याच्या पाण्यात वाहुन मृत्यु झाला आज सकाळी सात वाजता त्या कोविड लसीचा डोस घेण्यासाठी चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात जात होत्या पऱ्याला पुराचे पाणी आल्याने पऱ्या ओलांडताना ही घटना घडली.

     गुहागर – अंजनवेल येथुन पाच फायबर होडया रस्ते मार्गाने चिपळुण येथे भोई समाजाकडुन पाठवण्यात आल्या असुन भोईसमाज जातीनीशी बचाव कार्यांत जुंपला आहे.

     राजापुर शहर आणी तालुक्यात गेल्या आढवडयापासुन संततधार पाऊस कोसळत असुन अर्जुना आणी कोदवली नदयांना पुर आला पुराच्या पाण्यात राजापुर शहर, बाजारपेठ व परिसरात पाणी घुसल्याने शेतीची नुकसानी तर स्थलांतर करण्याची वेळ आली तसेच अनेक घरांना तडे गेल्याने धोकादाय बनलेल्या घरांतील नागरिकांचे प्रशासनाकडुन स्थलांतर  करण्यात आले आहे.

     सिधुदुर्ग जिल्हयातील मच्छीमार व रत्नागिरी, जयगड येथील मच्छीमार, तटरक्षक दलांच्या बोटी चिपळुणात दाखल होत असुन व्यापारी संघाने धान्य घेवुन आपली पथके चिपळुणात धाडली आहेत जिल्हयामधुन गावपातळीवरील तरुण मंडळे, सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी पोहोचली आहेत. मात्र सरकारी पातळीवर वेळ पडल्यास हेलिकॅपटर मदतीसाठी पाठवण्याची घोषणा हवेत विरली असुन स्थानिक पातळीवर बचाव कार्य जोरात चालु आहे. संगमेश्वर, बावनदीपासुन मार्ग बंद झाल्याने रत्नागिरीचे पालकमंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री उशीरा पर्यंत पोहचु शकले नाहीत मात्र प्रशसकीय यंत्रणा हलवत मदत कार्य कसे पोहोचेल याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!