पनवेल,दि.१६: दिनांक ०९ ऑगस्ट २०२२ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये राज्यात “स्वराज्य महोत्सव” चे आयोजन करण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी “समूह राष्ट्रगीत गायन” सकाळी ११.०० ते ११. ०१ या एका मिनिटांमध्ये एकाच वेळी राज्यात सर्वत्र होणार आहे. पनवेल महापालिका हद्दीमध्ये हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. मनपा हद्दीत सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यारिता चारही प्रभागातील माॅल्स, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, मंदिरे अशा विविध ठिकाणी लाऊड स्पीकरच्या माध्यमातून दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी समुह राष्ट्रगीत गायन, सकाळी ११.०० ते ११. ०१ या एका मिनिटांमध्ये एकाच वेळी घेण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.