पनवेल दि.७: दिबांच्या आणि आपल्या संघर्षामुळे नामकरण लढ्याने एक वेगळी उंची गाठली आहे. या संघर्षाचा आणि आंदोलनाचा सन्मान करीत सरकार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करीत लवकरच नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव जाहीर करेल, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी आज नवी दिल्ली येथे जाहीर केली.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने नामकरण संदर्भात लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती बरोबर आयोजित केलेल्या बैठकीत नामदार नायडू बोलत होते. नामकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच या संदर्भातील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी कृती समितीने मागणी केल्याप्रमाणे आजची बैठक नवी दिल्ली येथे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या आग्रहाने आयोजित करण्यात आली होती. यावेळी समितीशी बोलताना केंद्रीय मंत्री नायडू यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले की, दिबां व्यतिरिक्त इतर कोणाचेही नावाचा प्रस्ताव आमच्या मंत्रालयाला आलेला नाही. निवडणुका आणि राजकारण यांच्यापेक्षा दिबांचे नाव फार मोठे आहे.त्यांच्या नावासाठी कोणाचा अडथळाही नाही, आमचे सरकार दिबांच्या संघर्षाचा सन्मान करते. त्यांच्या नावासाठी आपण केलेल्या संघर्षाच्या आपल्या भावनाही आम्ही जाणतो. दिबांच्या आणि आपल्या संघर्षांचा सन्मान करीत आम्ही लवकरच दिबांचे नाव विमानतळाला जाहीर करू. राज्य सरकारने पाठवलेला नामकरणाचा प्रस्ताव प्रक्रियेचा भाग म्हणून मंजुरीस पाठवला आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून पीएमओ आणि कॅबिनेटकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत मंत्रीमहोदयांनी विमानतळ सुरू होण्याआधी नामकरणाची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दिबांचे नाव जाहीर करण्यास आम्हाला आनंद वाटेल, असे यावेळी अधोरेखित केले.
याप्रसंगी झालेल्या चर्चेत माजी केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, खासदार धैर्यशील पाटील, समितीच्या वतीने अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार राजूदादा पाटील, भूषण पाटील, जे डि. तांडेल, संतोष केणे आदी मान्यवरांनी सहभाग घेतला होता. बैठकीसाठी अतुल दिबा पाटील, जे. एम. म्हात्रे, राजेश गायकर, विनोद म्हात्रे, दीपक पाटील, शरद म्हात्रे, सुशांत पाटील आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव विमलूमंग वुलनाम आणि निर्देशक नयोनिका दत्ता आदि यावेळी उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!