सुधागड दि०७ : नवरात्री उत्सवात विविध उपक्रम आयोजित केले जातात, साकारले जातात. मात्र समाजाला दिशा देणारे सामाजिक हिताचे कार्यक्रम आयोजित करणे ही सद्यस्थितीतली दुर्मिळ बाब आहे याला छेद देत सुधागड तालुक्यातल्या अतिदुर्गम भागात असलेल्या पाच्छापूर मधल्या समस्त रणरागिनी महिलांनी ग्रामस्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. रविवारी सकाळपासून पाच्छापूरचे विविध भागात हाती झाडू घेऊन स्वच्छता निर्मूलनाचा संदेश साऱ्या समाजाला देऊन गाव झाडून स्वच्छ केल आहे. स्वच्छता निर्मूलनाच्या उपक्रमात पाच्छापूर मधील सर्वच महिलांनी मोठ्या हिरीरीने सहभाग घेऊन एक नवा आदर्श समाजासमोर उभा केला आहे.
नवरात्र उत्सवामध्ये विविध गावांकडून विविध उपक्रम आयोजित केले जातात. मात्र या उत्सवामध्ये ग्राम स्वच्छता करण्याचा एक अभिनव उपक्रम सुधागड तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या पाच्छापूर गावातील समस्त महिला वर्गांनी रविवारी हाती घेतला. ही संकल्पना पाच्छापूर मधील होतकरू तरुण प्रल्हाद ओंबळे यांनी ग्राम समिती समोर मांडली .त्याला पाश्चापूर मधील सर्वच महिलांनी होकार देऊन रविवारी सर्वच घरातील महिलांनी हाती झाडू घेऊन पाच्छापूर मधील रस्ते ,वाड्या ,देऊळ, शाळा परिसर हा झाडून चकाचक केला. रस्त्याच्या बाजूला उगवलेले मोठे मोठे गवत, झाडोरा छाटून फोडून रस्ते ही मोकळे केले. प्लास्टिक, कागद, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या काचेच्या बाटल्या, तसेच निसर्गाला बाधक ठरणारे सर्व कचरा एकत्रित जमा करून तो जाळून ही टाकला. या उपक्रमात पाच्छापूर मधील सर्वच महिलांनी मोठ्या दिमतीने पुढाकार घेतला. त्याला घरातल्या पुरुष मंडळींनी मोठा हातभार लावला. नवरात्रीमध्ये एक अनोखा उपक्रम या पाच्छापूर मधल्या ग्रामस्थांनी करून एक नवा आदर्श समाजासमोर उभा केला आहे. पाच्छापूर मधील समाज हिताची भूमिका बजावणारी ग्रामविकास समिती व त्यामधील सदस्या सुजाता शिदोरे यांनी याबाबत पुढाकार घेऊन महिलांमध्ये ग्रामस्वच्छतेचा संदेश देणारी संकल्पना रुजवली. त्याला महिलावर्गांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन संपूर्ण पाच्छापूर गाव, सोनारवाडी व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून ग्रामस्वच्छतेचा संदेश या नवरात्री उत्सवा दरम्यान समाजाला दिला असल्याने या पाच्छापूर मधील महिलांचे सर्वत्रच कौतुक केले जात आहे.
देश चालवण्याची क्षमता आता महिलांच्या हाती आली आहे. महिला आपल्या बुद्धी कौशल्याने घरा बरोबर समाजाची ही व्यवस्था चालवु शकतात. अन हीच संकल्पना मनात आल्यानंतर आपले गाव आपला परिसर स्वच्छ नीटनेटका व रोगमुक्त व्हावा यासाठी नवरात्री उत्सवा दरम्यान सर्व महिलांनी पुढाकार घेऊन ग्राम स्वच्छता चांगल्या प्रकारे केली. त्यामुळे आम्हाला निश्चितच मनाला समाधान लाभलं आहे. आगामी काळातही नेहमीच ग्रामस्वच्छता करण्याचा संकल्प आम्ही सर्वांनी केला आहे.
सुजाता कमलाकर शिदोरे – ग्रामविकास समिती सदस्या, पाच्छापूर.