अलिबाग,दि.१४ : भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषांची पूर्तता करण्याकरिता सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अधिपत्याखालील जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग या रुग्णालयातील रुग्ण खाटांचा वापर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील अलिबाग येथे नियोजित नवीन शासकीय महाविद्यालयासाठी वापर करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.
सन 2012 मध्ये तत्कालीन वित्त मंत्री सुनिल तटकरे यांनी या वैदयकीय महाविदयालयाच्या मंजूरीची घोषणा केली होती. तर आता याकरिता पालकमंत्री आदिती तटकरे यांनी हे वैदयकीय महाविद्यालय लवकर सुरू करण्याबाबत तसेच पुढील कार्यवाही होणेबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुषंगाने आज या शासकीय वैदयकीय महाविद्यालयासाठी जिल्हा रुग्णालयाचा वापर करण्यास शासन मान्यता मिळाली असून याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
अलिबाग नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रूग्णालय स्थापनेबाबत रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आवश्यक जागा उपलब्ध करून दिली असून या जागेची मोजणी प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.
त्याचप्रमाणे शासनाकडून या शासकीय वैदयकीय महाविद्यालयासाठी डॉ.गिरीश ठाकूर यांची अधिष्ठाता म्हणून निुयक्तीही करण्यात आली आहे.