कल्याण दि.१४: नालासोपारा भागात वीजबिल कमी करण्याच्या बहाण्याने काही भामट्यांनी वीज ग्राहकाची फसवणूक केल्याची तक्रार महावितरणकडे आली आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणकडून आवाहन करण्यात येते की, वीजबिलाच्या कोणत्याही तक्रारींसाठी महावितरणचे संबंधित कार्यालय अथवा संकेतस्थळ, मोबाईल अँप या डिजिटल माध्यमांचा उपयोग करावा. कोणत्याही परिस्थितीत वीजबिलाचा भरणा डिजिटल माध्यमातून किंवा महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्रातच करावा व त्यांच्याकडून छापील भरणा पावती घ्यावी. वीजबिल भरणा व तक्रारींबाबत महावितरण बाह्य कोणत्याही व्यक्ती अथवा घटकांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.
नालासोपारा पश्चिम उपविभागात वीजबिल कमी करून देण्याच्या बहाण्याने बनावट पावती देऊन एका महिलेची फसवणूक झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. संबंधित महिलेची तक्रार प्राप्त होताच अतिरिक्त कार्यकारी अभियंता कृष्णकांत झरकर यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार दिली. बनावट पावती व शिक्क्यांच्या आधारे ग्राहकांची फसवणूक करण्यात आल्याचे यात निदर्शनास आले आहे. वीजबिलाच्या तक्रारीसाठी महावितरणचे संबंधित कार्यालय तसेच www.mahadiscom.in हे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल अँप या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच वीजबिल भरणा करण्यासाठी अधिकृत बिल भरणा केंद्र व संकेतस्थळ, अँप, पेमेंट अँप आदी डिजिटल पर्याय उपलब्ध आहेत. वीज ग्राहकांनी या सुविधांच्या माध्यमातूनच तक्रारी व बिल भरणा करावा. बाहेरील व्यक्ती अथवा घटकाच्या आमिषाला बळी पडून फसवणूक झाल्यास त्याला महावितरण जबाबदार राहणार नाही. याची नोंद घेऊन सावधगिरी बाळगण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.