प्राथमिक तपासांती कोणताही धोका नसल्याची माहिती
अलिबाग, दि.05: रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात बावळे येथे पावसामुळे येथील परिसरात भेग पडल्याचे निदर्शनास आले होते. जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार वरिष्ठ भूवैज्ञानिक हनुमंत संगनोर, वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा जिल्हा खनिकर्म अधिकारी राजेश मेश्राम यांच्यासह प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशिद यांनी या गावपरिसराला भेट देऊन तेथील जमिनीला पडलेल्या भेगेची तातडीने पाहणी केली.
     महाड तालुक्यातील बावळे या गावपरिसरातील जमिनीला पडलेली ही भेग उत्तर-दक्षिण असून त्याची लांबी सुमारे 15 ते 20 मीटर एवढी आहे. या भेगेची खोली दीड ते दोन फूट असून त्यात पाणी साठलेले आहे. या बाबीवरून ही भेग मातीमध्ये पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे पडलेली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तथापि या भेगेबाबत सविस्तर अभ्यास करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग, पुणे यांना कळविण्यात आले आहे.
     प्राथमिक पाहणी दरम्यान या भेगांमुळे कोणताही धोका संभवत नसून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून या भेगेची दररोज दोन ते तीन वेळा पाहणी करून काही बदल असल्यास स्थानिक प्रशासनास त्वरित कळविण्याबाबत संबंधित सरपंच व गावकऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!