पनवेल, दि.१५: पनवेलमध्ये शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश चंद्रशेखर सोमण हे संस्थापक सल्लागार असलेल्या शिवसेना प्रणित ’शिवप्रेरणा श्रमिक कामगार संघटना’ या कामगार युनियन यांच्या सततच्या संघर्ष व पाठपुराव्याने घंटागाडी व साफसफाई कामगारांचा 2018 ते 2021 या मधील कालावधीतील अडकलेला तब्बल साठ लाख रुपये पीएफ 110 हुन अधिक कामगारांच्या खात्यात जमा झाला आहे. हे सर्व कामगार कंत्राटी स्वरूपात पनवेल महानगरपालिकेमध्ये स्वच्छता विभागात कार्यरत असून कंत्राटदार व महानगरपालिका यांच्या ढिसाळ कारभारामुळे तब्बल तीन वर्षांचा भविष्य निर्वाह निधी कामगारांना मिळालाच नव्हता. तुटपुंज्या पगारावर अत्यंत मेहनत करणार्या या कामगारांचा पीएफ वेतन मधून कपात करूनही त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला नव्हता. शिवसेनेचे प्रथमेश सोमण यांनी या प्रकरणाचा महापालिका व कंत्राटदाराकडे प्रचंड पाठपुरावा केला. कामगार आयुक्तालयात कायदेशीर लढाई देखील लढली व अखेरीस तब्बल चार वर्षांनी हा मागील वर्षांचा अडकलेला पीएफ कामगारांच्या खात्यात जमा करण्यात आला.
एवढी मोठी रक्कम इतक्या वर्षाने कामगारांना त्यांच्या खात्यात बघून संघर्ष यशस्वी झाल्याचे समाधान वाटले. अनेक कामगारांनी त्या मागील वर्षांचा पीएफ मिळणे शक्य नसल्याने त्यावर जवळजवळ पाणी सोडले होते परंतु कामगार युनियनच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे एवढी मोठी रक्कम आम्हा गरीब कामगारांना मिळाली अशी भावना संघटनेचे अध्यक्ष अनित कुमार गागडा यांनी व्यक्त केली, तर संघर्ष करावा लागला तरीही जुना कंत्राटदार व महापालिकेचे अधिकारी यांनी अखेरीस आवश्यक ते सहकार्य केल्यामुळे कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले असे म्हणून महापालिका प्रशासनाचे, कंत्राट दाराचे व संघर्षात साथ दिलेल्या सर्व कामगारांचे प्रथमेश सोमण यांनी आभार मानले.