पनवेल दि.४ (हरेश साठे) कोणत्याही क्षेत्रात ज्येष्ठांच्या अनूभवी मार्गदर्शनाशिवाय यशस्वी वाटचाल करणे शक्य नाही आणि त्यांच्या अनुभवाची शिदोरी समाजाला दिशा देणारी आहे. त्यामुळे ज्येष्ठांचा सन्मान व त्यांच्याप्रती आदर व्यक्त करत गुरुवारी दि.०२ रोजी सायंकाळी न्हावा खाडी येथे उत्तर रायगड जिल्हा भाजप व रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा हृद्य सत्कार करण्यात आला. निमित्त होते ते समाजसेवेचा अथांग सागर, दानशूर व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्यांचे आधारवड असेलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७१ वा वाढदिवस. भव्य शामियानात झालेल्या या सोहळ्याने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समाजाला ऊर्जा देणारा ठरला.
आणि या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभलेले माजी मंत्री विद्यमान आमदार लोकनेते गणेश नाईक, माजी मंत्री विद्यमान आमदार रवीशेठ पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार महेश बालदी, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव या सोहळ्यात केला. गरिबीतून मोठे झालेले लोकनेते रामशेठ ठाकूर कधीच गरिबांना विसरले नाहीत, त्याचबरोबरीने समाजसेवेचा अखंड यज्ञ सुरूच असल्याचे गौरवोद्गार त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिष्टचिंतन करताना मनोभावे व्यक्त केले. यावेळी या उपस्थित मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांचे भव्य पुष्पहार देऊन अभिष्टचिंतन केले. यावेळी व्यासपीठावर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर, स्व. दि. बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, सामाजिक कार्यकर्ते दशरथ भगत, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहासात ज्या थोर व महनीय व्यक्तींनी आपल्या कर्तुत्वाने नवी दिशा दिली. त्या व्यक्तीमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव फार महत्वाचे आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रात स्वकर्तृत्वाने त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले. पण ते कधी सर्वसामान्य माणसाला विसरले नाहीत, आजही ते तळागाळात मदत करत असतात म्हणून त्यांची दानशूर कीर्ती देशभर आहे. आणि त्यांचा माणसावर जास्त विश्वास आहे, त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त न्हावा खाडी येथे ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अभिष्टचिंतन सोहळा, आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उलवा नोडसाठी देण्यात आलेल्या रुग्णवाहिका व शववाहिकेचे लोकार्पण, तसेच महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत व नंदेश उमप निर्मित लोककलांतून महाराष्ट्राच्या वैभवशाली संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘मी मराठी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे. ज्येष्ठ नागरिक हे कुटुंब आणि समाजाला नेहमीच मार्गदर्शक आणि हितचिंतक राहिलेले असतात. वृद्धपण हे देवाने माणसाला बहाल केलेले दुसरे बालपण असते. मनुष्याचा वृद्धापकाळ हा नेहमी समाधानी आणि आनंदपूर्ण असायला हवा. आणि त्यासाठी सामाजिक आणि कौटुंबिक सहाय्य महत्वाचा दुवा ठरतो. त्यामुळे सामाजिक भावना लक्षात घेत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान या सोहळ्यात होत असताना कुटुंबवत्सल वातावरण अधोरेखित होत होता. काही ठिकाणी ज्येष्ठ अडसर म्हणून समजले जातात पण लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेहमीच ज्येष्ठांचा सन्मान केला आहे. किंबुहना रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याचे समारंभ त्यांनी केले आहेत. आज पर्यंत लाखाहून अधिक ज्येष्ठ नागरिकांचे त्यांनी सत्कार करून ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर सन्मान केला आहे. त्या अनुषंगाने हि परंपरा कायम ठेवत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.